बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांची जयंती बार्शीत समाजदिन म्हणून दि. ४ फेब्रुवारी रोजी दरवर्षी साजरी करण्यात येते. त्यांच्या जयंतीचे हे १११ वे वर्ष असून जयंतीनिमित्त संस्थेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थाध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव यांनी दिली.
    सोमवारी दि. ३ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त, गुणवत्ताधारक विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार प्रा.गंगाधर बनभरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मंगळवारी दि. ४ रोजी सकाळच्या सत्रात जनजागरण मिरवणूक, दुपारच्या सत्रात वीरमाता, वीरपत्नी, सामाजिक, शैक्षणिक, कृषि आणि वैद्यकिय क्षेत्रातील कर्तबगार मान्यवरांचा गौरव करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी ग्रामविकास मंत्री ना. जयंत पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री दिलीप सोपल, खासदार डॉ.पद्मसिंह पाटील, माजी खासदार शिवाजी कांबळे, माजी आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष कादर तांबोळी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
    या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी व्ही.एस.पाटील, सहसेक्रेटरी डॉ.जी.एम.पाटील, जयकुमार शितोळे, खजिनदार अरुण देबडवार, प्राचार्य मधुकर फरताडे आदी प्रयत्न करीत आहेत.
 
Top