नळदुर्ग :- सलग दुस-या दिवशी म्‍हणजे गुरुवारी दुपारी तीनच्‍या सुमारास जोरदार वादळी वा-यासह पावसाने नळदुर्ग व परिसराला झोडपून काढले. तर किलज (ता. तुळजापूर) शिवारात वीज पडून एक बैल जागीच ठार झाला. तसेच परिसरात वादळी वा-यामुळे अनेकांच्‍या घरावरील पत्रे उडून गेले. अवेळी झालेल्‍या पावसामुळे काढणी सुरु असलेल्‍या ज्‍वारी, गहू, हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले असून तालुक्‍यातील मुर्टा व मानमोडी शिवारात जवळपास चारशे एकर द्राक्ष बागेचे नुकसान झाल्‍याचे प्राथमिक अंदाज आहे.
       तुळजापूर तालुक्‍यातील किलज शिवारातील आमराई तांडा येथे गोविंद मानसिंग राठोड (रा. आमराई तांडा, किलज) हे शेतात दुपारी नांगरत होते. ढगाळ वातावरणामुळे बळीनांगर सोडून नांगरालाच बैल बांधून चारा टाकले. तेथून गोविंद राठोड हे घराकडे जात असताना जोरदार वादळी वारा होऊन मोठा पाऊस झाला. यावेळी अचानक वीज पडून नांगरला बांधलेल्‍या एका बैलाच्‍या  अंगावर वीज कोसळली. या दुर्घटनेत एक बैल जागीच ठार झाला. तर दुसरा बैल दोरखंड तोडून दुसरीकडे पळून गेला. 
          अशोक राठोड (रा. आमराई तांडा), बंडू पवार, राजेंद्र राठोड, मोतीराम पवार (तिघे रा. मारखोरी तांडा) यांच्‍या घरावरील पत्रे वादळी वा-याने उडून गेल्‍याने मोठे नुकसान झाले आहे. त्‍याचबरोबर शेतातील काढणीला आलेल्‍या पिकाचे मोठे नुकसान झाल्‍याचे सरपंच राजेंद्र राठोड यांनी बोलताना सांगितले. दरम्‍यान तुळजापूर तालुक्‍यातील येडोळा, लोहगाव, वागदरी, गुजनूर, शहापूर, मानेवाडी, जळकोट, मुर्टा, होर्टी, अणदूर, गंधोरा, बोरनदीवाडी यासह परिसराला पावसाने झोडपून काढले. बोरनदीवाडी येथे अवेळी पावसामुळे काढणी सुरु असलेल्‍या पिकाचे मोठे नुकसान झाल्‍याचे सरपंच तानाजी चव्‍हाण यांनी सांगितले. तर मुर्टा गावच्‍या शिवारात शेती पिकाचे नुकसान झाले असून ज्‍वारी व कडबा काळा पडला. तर मोठ्याप्रमाणावर हरभरा, गहू पिकाचे नुकसान झाल्‍याचे निलकंठ इटकरी यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.
       मुर्टा, मानमोडी (ता. तुळजापूर) येथे जवळपास चारशे एकर द्राक्षांच्‍या बागा असून अवकाळी पावसामुळे द्राक्षांच्‍या बागेतील मणीं गळून पडले. पाने फाटले, द्राक्षेचे घड तुटून खाली पडले. यामुळे बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या भागातील माल तयार झाला होता. तर काही जणांचे तोडणी सुरु आहे. मात्र अवकाळी पाऊस व वादळी वारा दोन दिवस झाल्‍यामुळे बागेचे प्रचंड नुकसान झाले. पहिल्‍या दिवशी द्राक्ष बागेचे तीस टक्‍के, तर गुरुवार रोजी झालेल्‍या वादळी वा-यामुळे जवळपास निम्‍मे बागांचे नुकसान झाले असून शासनाने शेतक-यांच्‍या शेतीचे तात्‍काळ नुकसानीचे पंचनामे करुन मदत देण्‍याची मागणी प्रगतशील शेतकरी गोपाळ सत्‍यवान सुरवसे यांनी केली आहे.
 
Top