बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शीतील ऐनापूर रस्त्यावरील नागरिकांना नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाची देणगी म्हणून कित्येक वर्षांपासून काळ्या पाण्याची शिक्षा दिली जाते. हे काळे पाणी म्हणजे गटारीतील मैलामिश्रीत गाळ होय.
    बार्शी शहराची भर मध्यवस्ती व मुख्य बाजारपेठेतील ऐनापूर मारुती
मार्गावर अगदी किरकोळ पावसानेही कित्येक वर्षांपासून पाणी साठत आहे. सदरच्या मार्गावर येणारे पाणी हे आजू बाजूच्या सर्व परिसरातून वाहणारे पाणी असून सांडपाण्याची नीटपणे व्यवस्था नसल्याने, गटारीतील गाळ वेळोवेळी काढण्यात येत नसल्याने, गरजेपेक्षा लहान गटारी असल्याने, लेंडीनाला बंदिस्त केल्याने तसेच राजकिय हेतूने येथील नागरिकांना त्रास देण्याच्या उद्देशाने, स्वच्छता कर्मचार्‍यांना पाठीशी घालण्यासाठी, कागदोपत्रीच स्वच्छता होत असल्यानेही नागरिकांना त्रास होत आहे. थोड्या पावसानेही दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर साठल्याने नागरिक नाकातोंडाला हात लावून ये-जा करतात. बर्‍याच वेळेस लहान मुले, महिला व वृध्द पुरुषांना पाठीमागून भरधाव वेगाने वाहनधारक घाण पाणी उडवून जातात. बर्‍याच ठिकाणचे नागरिक देखिल जाणीवपूर्वक केरकचरा उघड्या गटारांत टाकून मोकळे होतात. अनेक ठिकाणच्या कचराकुंड्या व सार्वजनिक मुतार्‍यांची संख्या कमी होत असल्यामुळे मिळेल त्या ठिकाणी नागरिक घाण करतांना दिसून येत आहे. ऐनापूर रस्त्यावरील मुतारीदेखिल दुरुस्तीच्या नावाखाली दोन तीन वर्षांपूर्वीच नेस्तनाभूत करण्यात आली त्याचा वापर करणारे नागरिक निर्लज्जपणे उघड्यावरच आपला विधी उरकू लागले. उघड्यावरील घाण कमी करण्यासाठी राजकिय सल्ल्याने वेगळाच फॉर्मुला वापरल्यानंतर वापरकर्ते व्यापार्‍यांच्या दुकानांच्या कुलूपांवर आणि घरासमोर घाण करत असल्याने वेगळीच समस्या निर्माण होत आहे. खुश्कीचा मार्ग व सतत महिलांची वर्दळ असलेला परिसर म्हणून दत्त बोळ प्रसिध्द आहे. सदरच्या ठिकाणचा स्लॅब फोडून गाळ काढण्यात आला परंतु त्या ठिकाणी डागडुजी करणे व सांडपाण्यालामार्ग करणे गरजेचे होते. परंतु तात्पुरता मुरुम टाकून बुजविण्यात आल्याने, अल्पशा पावसाने चिखल झाला आहे. अत्यावश्यक सेवा असलेल्या आरोग्य खात्याचे प्रत्येक भागात विविध प्रश्‍न निर्माण झाले आहेत, दिवसेंदिवस आरोग्य खात्याचा खर्चही वाढविण्यात येतो परंतु नागरिकांना कोणत्याही प्रकारची सुविधा मिळत नसल्याने नाराजी वाढत आहे.
 
Top