पांगरी (गणेश गोडसे) -: पांगरी (ता. बार्शी) परिसरात बुधवारी सायंकाळी वादळी वा-यासह व विजेच्या गडगडाटात अवकाळी पाऊस झाला. संपुर्ण रात्रभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतक-यांसह ज्वारी, गहु, आंबा, कांदा, फळभाज्या आदी पिकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. गुरुवारी सकाळी कडक उन पडल्यामुळे द्राक्षांचे घड फुटण्‍यास मोठया प्रमाणात सुरूवात झाली आहे.
    पांगरी मंडलचे आर.एस.देशमुख यांनी द्राक्षबागांची पाहणी करूण 60 टक्के बागा नुकसानग्रस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला असुन वरिष्ठांचे आदेश आल्यानंतर पंचनामे करू, असे बोलताना सांगितले. दुपारपासुनच आकाशात काळे ढग जमा होऊ लागले होते. विजांचा कडकडाटही होत होता. सहा वाजण्‍याच्या सुमारास अचानक वादळी वा-यासह पावसाला प्रारंभ झाला. वरूणराजाने चांगलीच हजेरी लावली. यादरम्यान अर्ध्या तासाच्या आसपास व पुन्हा रात्री 9 वाजण्‍याच्या सुमारास पुन्हा पावसाने हजेरी लावली. 5 ते 6 दिवसांपासुन असेच वातावरण या भागात असल्यामुळे आजही वरूणराजा येथे हजेरी लावणार नाही अशी आशा शेतक-यांना होती. पांगरी व कारी भागात सोलापुर जिल्हयात सर्वाधिक द्राक्षबागांचे क्षेत्र आहे. द्राक्षबागांचा हंगाम निम्यावर आला होता. कांही बागा मध्यावर तर कांहीची तोडणी आजपासुन करण्‍यात येणार होती. बाजारपेठेत द्राक्षांना उठाव नसल्यामुळे शेतक-यांच्या निम्या बागा हया शिल्लक होत्या. व्यापारी बागा घेण्‍यास टाळाटाळ करत असल्यामुळे अनेकांच्या बागा तशाच उभ्या राहील्या असल्यामुळे त्या शेतक-यांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका सहन करावा लागला आहे. आधीच दुष्काळच्या छायेत सापडलेल्या शेतक-यांचे अवकाळी पावसाने कंबरडेच मोडले आहे. व्यापारी अवकाळी पाऊस पडल्यामुळे व द्राक्षांना तडे जात असल्यामुळे घेतलेल्या बागा सोडतात. त्यामुळे पांगरी परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
    प्रत्येक शेतकरी व्यापा-यांना विनवणी करून आपलीच बाग नेण्‍यासाठी तयार करत असल्याचे चित्र आज पांगरीत पहावयास मिळत होते. निसर्गाच्या लहरीपणापुढे द्राक्ष उत्पादक शेतकरी पुरता हतबल झाला आहे. व्यापा-यांनी दरात 40 टक्के घट केली आहे. निसर्गाने एका क्षणात शेतक-यांचे आर्थिक स्वप्न उदधवस्त केले असुन अपेक्षित उत्पादनात त्यांना 50 टक्के घट सहन करावी लागणार आहे. पांगरीसह उक्कडगांव पांढरी, चिंचोली, चारे, शिराळे, पिंपळवाडी, धानोरे, आगळगांव आदी भागातही पाऊस पडल्याचे वृत्त आहे. अवकाळी पावसामुळे व्यापा-यांनी घेतलेल्या बागा सोडुन देण्‍यास सुरूवात केली आहे. गतवर्षीही 18 मार्चला पडलेल्या अवकाळी पडलेल्या अवकाळी पावसामुळे या भागातील शेतकरी पुर्णतः कंगाल झाला होता.
        कांही दिवसांपासुन पांगरी परिसरातील ढगाळ पावसाच्या वातावरणामुळे व बदलेल्या हवामानामुळे द्राक्ष उत्पादक शेतक-यांची झोप उडाली होती. व्यापारी बाजारपेठेत दर कोसळल्यामुळे ठरवुन घेऊन कापनी सुरू केलेल्या बागा आहे तशा अवस्थेत उभ्या सोडुन देऊन पळ काढत आहेत. त्यामुळे द्राक्ष ऊत्पादकांमधुन तिव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यांना एकवेळचे अन्नही गोड लागेनासे झाले आहे. उत्पादक शेतकरी बागा ठरलेल्या दरांपेक्षा दर कमी करून द्राक्षे घेऊन जावाच अशी विनवणी करताना दिसत आहेत. अलीकडील काही दिवसात ठरवुन घेतलेल्या बागा मधुनच सोडण्‍याच्या व्यापा-यांच्या पध्‍दतीमुळे पांगरी परिसरात व्यापारी व शेतक-यांमध्ये अनेकदा खटके उडण्‍याचे प्रकारही घडले आहेत. क्‍वचीतप्रसंगी व्यापा-यांना दम भरूनही द्राक्षे कापण्‍यास भाग पाडल्याचे प्रकारही घडले आहेत. यावर्षी व्यापा-यांची संख्या या भागात खुपच कमी प्रमाणात आढळुन येत आहे.
    पांगरी व कारी परिसरात द्राक्ष बागांची संख्या लक्षणीय असुन बागा विक्रीस आलेल्या आहेत. वर्षेभर द्राक्ष ऊत्पादक शेतक-यांना डावणीचा प्रादुर्भाव अवकाळी पावसाचा फटका मिलीब्गज, थ्रिप्स आदी अनेक नैसर्गिक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. चालु हंगाम जोमात होत असला तरी पाऊस कमी झालेला असल्यामुळे सध्या अनेक शेतक-यांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असुन पुढील एप्रिल महिन्यात द्राक्ष उत्पादक शेतकरी छाटनी कशी करायची व पुढील वर्षीसाठी बागा कशा जोपासायच्या या एकाच विवंचनेत आहे. कारण ज्या बागांना एप्रिल छाटणीच्या वेळी पाणी मिळत नाही त्या बागा आगामी वर्षी फेल जातात. ओषधे खते यांच्या किमतीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत भरीव वाढ झालेली असल्यामुळे यावर्षी उत्पादन खर्चात ही मोठी वाठ झाली आहे. वातावरणातील बदल मजुरित झालेली दुप्पट वाढ निसर्गाची अवकृपा शासनाचे द्राक्ष उत्पादक शेतक-याबाबत असलेले उदासिन धोरण यासह विविध समस्यांच्या गर्तेत द्रास उत्पादक सापडला आहे. निसर्गाच्या लहरीपणावरील पिक म्हणु या पिकाकडे पाहीले जाते. द्राक्ष पिकाला शासनाने हमी भाव जाहीर करून द्राक्षापासुन उपपदार्थ निमिर्ती केंद्र पांगरीत सरू करावे, अशी येथील शेतक-यांची मागणी आहे. रक्ताचे पाणी करून जिवापाड सांभाळलेल्या द्राक्ष बागांमधुन भरमसाठ उत्पादनाची शेतक-यांनी धरलेली अपेक्षा फोल ठरू पहात असुन बाजारात उठाव नसल्याचे कारण सांगुन व्यापारी द्राक्ष उत्पादकांची पिळवणुक करत असुन बागा कवडीमोल दराने खरेदी करण्याच्या विचारात आहेत. यामुळे उत्पादक शेतक-यांचा जिव टांगणीला लागला असुन आता पुढे काय हा प्रश्‍न त्यांना भेडसावु लागलेला आहे. पांगरी भागातील अनेक शेतक-यांचे द्राक्षबागाचे प्लॉटस विक्रीस आलेले असुन शेतक-यांनी विचार करून शेवटी स्वतःच बागामधील द्राक्षे काढुन लातुर, नांदेड, परभणी, कळंब, अंबाजोगाई, अकोला, बीड, नागपूर, हिंगोली आदी ठिकाणी पाठवण्यास सुरूवात केलेली आहे. चालु वर्षी ऊत्पादन खर्चात मोठी भरीव वाढ झालेली असुन एकरी एक लाख तीस ते एक लाख चाळीस हजार रूपये खर्च झालेला असुन उत्पन्न घटल्यास अथवा दर कमी मिळाल्यास द्राक्ष ऊत्पादकाचा एकरी केलेला खर्चसुदधा मिळण्याची शक्यता नसल्याचे द्राक्ष उत्पादक शेतक-यांचे म्हणणे आहे. यावर्षी पाण्याअभावी अनेक द्राक्षबागाना द्राक्षे लागलेले नाहीत.
   द्राक्ष ऊत्पादकांच्या एकीची गरज
  पांगरी भागात ऐवढया मोठया जिवापेक्षा जास्त जपुन व रात्रीचा दिवस करून वर्षभर बागा जोपासल्या जातात पण त्या बागा विक्री करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा बाहेरच्या व्यापा-यांच्या पायावर लोटांगण घालण्याची वेळ द्राक्ष ऊत्पादक शेतक-यांवर प्रतिवर्षीच येते. त्यामुळे हे कुठेतरी थांबणे गरजेचे असुन शेतकरी टिकण्यासाठी त्यांनीच पुढे येणे गरजेचे असुन संघटन करून द्राक्षांसाठी बाजारपेठ शोधुन स्वतःच त्या बाजारपेठेवर कब्जा करणे गरजेचे आहे. पांगरीतुन जात असलेल्या पुणे-लातुर राज्यमार्गावर शेतक-यांनी द्राक्षांचे स्टॉल्स ऊभारल्यास त्यांना चांगला पतिसाद मिळण्याची शक्यता असुन शेतक-यांना हक्काची बाजारपेठ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादकाची अवस्था तोंड दाबुन बुक्यांचा मार अशीच झालेली असुन बागावर केलेले नियोजन पुर्णपणे कोलमडले आहे. बँकासह खाजगी सरकारी देणं कस फेडायच हा एकच प्रश्‍न शेतक-यांच्या समोर आहे. कृषी खात्याचे कर्मचारी पाहणी करू लागले असुन नुकसान भरपाई मिळणार का हे आगामी काळात कळेल.
    निवडणुकीपुरते शेतक-यांच्या मतदानासाठी त्यांच्या घराचे उंबरठे झिजवणा-या पुढा-यांना द्राक्ष उत्पादकांच्या परिस्थतीची पुर्ण माहिती असुनही कोणताच राजकीय पुढारी द्राक्ष उत्पादक शेतक-यासाठी काही करण्यास तयार नसुन या भागातील द्राक्ष ऊत्पादनाचे प्रमाण पाहता येथे एखादा छोटा-मोठा लघुउद्योग उभारून द्राक्षांपासुन उपपदार्थ निमिर्ती करून त्यांला बाजारपेठ उपलब्ध करून देणे गरजेचे असताना कोणीच याबाबत सकारात्मक असल्याचे दिसत नाही.
 
Top