उस्मानाबाद :- उस्मानाबाद जिल्हा टंचाईचा भीषण सामना करत असताना जिल्हाधिकारी म्हणून केलेल्या कामांची पावती देत उस्मानाबादकरांनी मावळते जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांना आज निरोप दिला तर नूतन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याकडून असलेल्या अपेक्षा लक्षात घेत तितक्याच समर्थपणे साथ देण्याची ग्वाहीही दिली.
    निमित्त होते, मावळते जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांची यशदा येथे उप महासंचालक म्हणून बदली झाल्याने त्यांना देण्यात येणाऱ्या निरोपाचे आणि नूतन जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्या स्वागताचे! येथील जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम रंगला. जिल्हा प्रशासनातील विविध अधिकारी-कर्मचारी संघटना, विविध कार्यालयांचे प्रमुख, विविध संस्था, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी भावपूर्ण सत्कार करुन डॉ. नागरगोजे यांना निरोप दिला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेंद्र तावडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
     अपर  जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्यासह सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, विविध विभागांचे कार्यालयप्रमुख, विविध कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. जिल्हा प्रशासनातील सहका-यांकडून डॉ. नागरगोजे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
     आपल्या मनोगतात डॉ. नागरगोजे यांनी आपल्या भावना अतिशय समर्पकपणे मांडल्या. नैतिक मूल्य सांभाळून आणि सर्वच अधिकारी व कर्मचारी यांना विश्वासात घेऊन टंचाई परिस्थितीत चांगले काम करता आले. राज्य पातळीवरही या कामाची दखल घेतली गेली, याचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. तुळजापूर विकास प्राधिकरणाची कामे अंतिम टप्प्यात आहेत, आम आदमी विमा योजनेत जिल्हा आघाडीवर आहे.  महसूल अभिलेखांचं स्कॅनिंग करण्यात जिल्ह्याने आघाडी घेतली. जास्त प्रचारावर भर न देता रिझल्ट देण्यावर आपला भर राहिल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
     नूतन जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी या काळातील चांगली कामे यापुढेही अधिक गतीमान करण्यावर आपला भर राहील. लोककल्याण हाच सर्व अधिकारी-कर्मचारी यांचा अजेंडा राहिला पाहिजे.त्यादृष्टीने सर्वांना बरोबर घेऊन काम करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रशासनात काम करताना शिस्त आवश्यक असून प्रत्येकानेच त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
     विविध मान्यवरांनी यावेळी डॉ. नागरगोजे यांच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आणि नवीन जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्याकडून अपेक्षाही व्यक्त केल्या.
 
Top