बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील राऊत चाळ परिसरातील सर्व सांडपाण्याचा प्रवाह रेल्वे स्टेशनरोडवरील लेंडी नाल्यात नेऊन सोडण्यात आला आहे. सदरच्या नाल्यावरील पूलातून पुढे जाणार्‍या पाण्याचा प्रवाह वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा, गाळ, काटेरी वनस्पती व वाळलेल्या काटेरी झुडूपांनी बंद झाला आहे.
    सदरच्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह थांबल्यामुळे डबके साठले आहे व या
ठिकाणी प्रचंड दुर्गंधी तसेच घाणीचे साम्राज्य पसरले आहे. आजूबाजूला राहणार्‍या मुलगे मळा, रुद्राके मळा तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
    अशाच प्रकारे घोरओढ्याजवळ साठलेल्या कचर्‍यामुळे अवकाळी पावसानंतर सात जणांचा बळी घेतला आहे. वेळोवेळी नाल्यांची सफाई करणे गरजेचे आहे परंतु नगरपरिषदेच्या आरोग्य कर्मचार्‍यांनी व अधिकार्‍यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. सार्वजनिक स्वच्छतेच्या अनेक तक्रारी येत असूनही नगरपरिषदेचा आरोग्य विभाग कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. वेळोवेळी सार्वजनिक स्वच्छतेसाठी खर्चाच्या वाढीची तरतूद करण्यात येत असतांनाही स्वच्छता होत नसल्याने अधिकारी साखरझोप घेत आहेत की काय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

 
Top