नळदुर्ग : मानवाच्‍या विकासासाठी शिक्षण हे आवश्‍यक असून शिक्षणामुळे माणूस स्वतंत्र्यरित्या विचार करु शकतो. त्याचबरोबर प्रत्येकाला शिक्षण हे मिळाले पाहिजे, असे सांगून राष्‍ट्र उभारणारे व चरित्र्य घडविणारे दर्जेदार शिक्षण  शैक्षणिक संस्‍थांनी देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कराड येथील प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्‍य महाविद्यालयात केले.
    नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी पाटणे हे मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी माजी आमदार सिद्रामप्‍पा आलुरे गुरुजी, पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, नगराध्यक्ष शहबाज काझी, अशोक पुदाले, लिंबराज कोरेकर, संभाजी पाटील, माजी नगराध्यक्ष मुश्ताक कुरेशी, प्राचार्य डॉ. सुहास पेशवे, प्राचार्य डॉ. जे.एस. मोहिते, यांची उपस्थिती होती.
    संस्‍थेचे दिवंगत अध्यक्ष कै. शिवाजीराव पाटील बाभळगावकर यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात घेण्यात आलेल्या शिबिरात पाऊणशे जणांनी रक्तदान केले. याबरोबरच स्मृतीदिनानिमित्त प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सामान्यज्ञान स्पर्धेलाही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला. विजेत्‍या स्पर्धकांना रोख रक्कम व प्रशस्‍तीपत्र देऊन सन्‍मानित करण्‍यात आले.
    कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य सुहास पेशवे व संभाजी पाटील यांनी तर सूत्रसंचालन प्रा. संतोष पवार, प्रा. झरीना पठाण यांनी केले. तर विद्यार्थी प्रतिनिधी दर्शन खारवे यांनी आभार मानले.
 
Top