बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: व्यर्थच्या चिंतनापासून मुक्त राहिल्यास जीवन सुकर व इतरांबद्दल चांगल्या भावना ठेवल्यास त्यांचेही जीवन सर्व संकटापासून मुक्त होईल. स्वत:सह इतरांचेही जीवन निर्विघ्न बनविण्याची प्रतिज्ञा करा, विघ्नांमुळेच दु:खाची निर्मिती होत असल्याचे ब्र.कु.संगीताबहनजी यांनी म्हटले.
     महाशिवरात्रीनिमित्त सेवाकेंद्रात आयोजित केलेल्या शिवध्वजारोहन, शिव अवतरण व शुभसंदेश या वर्षभर चालणार्‍या अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी रोटरीचे तेजस वखारिया, लायन्सचे प्रकाश महामुनी, विनोद बुडूख, वर्षा खांडवीकर, भ.के.गव्हाणे, वैजिनाथभाई, मोहनभाई आदी उपस्थित होते.
    संगीताबहनजी म्हणाल्या, महाशिवरात्रीच्या उपवासाकरिता आपण आपल्या दैनंदिन भोजनात बदल करुऩ स्थूल उपवास केला आहे त्याप्रमाणे नकारात्मक संकल्पांचा त्याग करुन सकारात्मक संकल्प अंगिकारल्यास सूक्ष्म उपवास घडेल. ब्रह्माद्वारे सत्ययुगाची स्थापना, विष्युद्वारे पालना तर शंकराद्वारे कलियुगाचा विनाश ही परमात्म्याची तीन कर्तव्ये आहेत. शिवलिंगाच्या पिंडीवर तीन पानाच्या बेलाची पाने, विभुतीचे तीन पट्टे धारण करतात. कलियुगातील काटेरी आणि विषारी फुलांप्रमाणे मनुष्याच्या अवगुणांना शिव परमात्मा हा ज्ञानामृताचा अभिषेक करतो. प्रत्येकातील शांती, प्रेम, आनंद अन पवित्रता या मूळ गुणांना जागृत करत सुगंधी फुलाप्रमाणे बनविले जाते, त्याचे प्रतिक म्हणून अभिषेक केला जातो, धोतर्‍याचे फूल अर्पण केले जाते. आपण आत्मरुपी दिपक असल्याचे सतत स्मरण व्हावे याकरिता नंदादिप लावण्यात येतो. सेवाकेंद्रातून सूक्ष्म धारणांचा अगिकार व शिवपरमात्मा राजयोगाचे शिक्षण देतात असेही त्यांनी यावेळी म्हटले.
 
Top