उस्मानाबाद :- भावी शिक्षकांनी ज्ञानरचनावादाचं तत्व समजावून घेऊन मुलांना त्याप्रमाणे मार्गदर्शन केले पाहिजे. मुलांचे भावविश्व आपण समजावून घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांनी केले.
    येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) आणि अंनिस, उस्मानाबादच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मुक्ता दाभोलकर यांचे शैक्षणिक क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टीकोन या विषयावर व्याख्यान झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.  अंनिसचे राज्य सचिव माधव बावगे, उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष एम.डी. देशमुख, डायटच्या प्राचार्य डॉ. कमलादेवी आवटे, महाराष्ट साहित्य परिषदेचे अध्यक्ष नितीन तावडे, सचिव बालाजी तांबे, प्रा. अर्जुन जाधव,  सुजीत ओव्हाळ, पत्रकार रवींद्र केसकर आणि चंद्रसेन देशमुख, शीतल वाघमारे, श्रीमती शिंदे आदींची उपस्थिती होती.
   यावेळी मुक्ता दाभोलकर यांनी, आपण प्रत्येक गोष्टीत वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासला पाहिजे, असे आवाहन केले. मुलांचे भावविश्व वेगळे असते. मात्र, आपण त्यांना प्रश्न विचारण्यापासून रोखतो. खरेतर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुलांना प्रश्न विचारु दिले पाहिजे. त्यांच्यातील संशोधक वृत्ती, जिज्ञासा जोपासण्याचे काम आपण केले पाहिजे. दुर्देवाने तसे होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
    मुलांचे भावविश्व समजून घेऊन त्यासाठी त्यांना योग्य वातावरण मिळायला हवं. शाळेत शिक्षक आणि घरी पालकांची ही जबाबदारी असल्याचे त्या म्हणाल्या. प्रश्न विचारल्याशिवाय समाजाची प्रगती होत नाही. स्वताच्या मनातील सत्याचा शोध घेणं हे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी भावी शिक्षकांनी अधिकाधिक वाचन केले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
    यावेळी बावगे यांनी अंनिसचे काम, महाविद्यालय स्तरावर विवेकवाहिनीच्या रुपाने सरु असणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. समाजातील अनिष्ट रुढी संपवण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन अत्यावश्यक असून महाविद्यालयीन जीवनात तो अधिकाधिक विकसित होत जातो. त्यामुळेच या युवक-युवतींची विज्ञाननिष्ठ, विवेकवादी समाजनिर्मितीसाठी मोठी जबाबदारी असल्याचे  बावगे यांनी नमूद केले.
    प्राचार्य डॉ. आवटे यांनी जिल्ह्यातील प्रत्येक अध्यापक विद्यालयात विवेकवाहिनी सुरु केली जाईल, असे सांगितले.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तांबे यांनी केले तर आभार अजय वाघाले यांनी मानले. कार्यक्रमास डायटमधील शिक्षकवर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top