सोलापूर :- वस्तुची उपयुक्तता, दर्जा या बाबी ग्राहकांसाठी महत्वाच्या आहेत. ग्राहकांनी आपल्या ग्राहक हक्काप्रती जागृत रहावे अशी अपेक्षा रोहयो उपजिल्हाधिकारी दिनेश भालेदार यांनी व्यक्त केली.
       जिल्हा पुरवठा कार्यालय, अन्नधान्य वितरण कार्यालय आणि ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भालेदार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश चव्हाण, ग्राहक पंचायत महिला अध्यक्ष शोभना सागर, पंढरपूर ग्राहक पंचायतीचे शशिकांत हरिदास, एस. टी.चे सहायक वाहतुक अधीक्षक  मुकुंद दळवी, प्रा. राजशेखर अळगीकर, बी.एस. पवार उपस्थित होते.
     भालेदार पुढे म्हणाले की, या ग्राहक कायद्याचा सर्वांनी उपयोग करुन घेणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक शासकीय, निमशासकीय आणि विविध कार्यालयांनी स्वत:हुन त्यांची माहिती सर्वसामान्यांना दिली तर ग्राहकांमध्ये जागृती निर्माण होईल.
    या कार्यक्रमात ग्राहकांच्या प्रबोधनासाठी उप प्रादेशिक परिवहन विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान (जि.प.), एस.टी. महामंडळ, अन्न आणि औषध प्रशासन विभाग, जि.प. प्राथमिक शिक्षण विभाग, सहायक नियंत्रक वैद्यमापनशास्त्र, जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा कार्यालय आदी कार्यालयांच्या लावण्यात आलेल्या स्टॉलची पहाणी मान्यवरांनी केली.
    या कार्यक्रमासाठी विविध विभागाचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
 
Top