उस्मानाबाद :- भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिल्या.
      येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज  गुरुवार रोजी  डॉ. नारनवरे यांनी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना निवडणूक काळात आचारसंहितेचे पालन करण्यासंदर्भात सूचना केल्या. जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, अपर पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रभुदय भांगे,  उपजिल्हाधिकारी बी. एस. चाकूरकर, कोषागार अधिकारी राहूल कदम, यांच्यासह विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.
     यावेळी डॉ. नारनवरे यांनी यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना उस्मानाबाद  लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ निहाय मतदारसंख्येची माहिती दिली.  मतदानकेंद्रे, त्याठिकाणी बीएलओमार्फत पुरविण्यात येणारी व्होटर स्लीपची सुविधा, 31 जानेवारी 2014 या अर्हता दिनांकास असणारी मतदार ओळखपत्राची संख्या, मतदार मदत केंद्र, ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स, मतदार जनजागृतीसाठी प्रशासनाकडून करण्यात येणारे प्रयत्न आदींची माहिती दिली.
      जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. नारनवरे यांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आदर्श आचारसंहिता काळात घ्यावयाच्या दक्षतेबाबत सूचित केले. सर्वच प्रतिनिधींनी यासंदर्भात वेळोवेळी भारत निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या निर्देशांचे तसेच त्यांनी जारी केलेल्या आदेशांचे कुठेही उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना केली.
उमेदवार आणि राजकीय पक्ष यांच्याकडून पेड न्यूजचा प्रकार होऊ नये,  यासाठी जिल्हास्तरीय मीडिया सर्टिफिकेशन आणि मीडिया मॉनिटरिंग समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या कार्यकक्षेची माहितीही यावेळी उपस्थित प्रतिनिधींना देण्यात आली. याशिवाय, ईलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांवर प्रसारणासाठी पक्ष अथवा उमेदवारांनी जाहिरात तयार केली असेल तर त्याचे या समितीकडून प्रमाणीकरण करुन घेणे अत्यावश्यक असल्याचे डॉ. नारनवरे यांनी यावेळी सांगितले.
      सर्वच राजकीय पक्षांनी त्यांना सभांसाठी, रैलीसाठी आवश्यक असणारे सर्व परवाने घेतले पाहिजेत. आचारसंहिता काळात विनापरवाना कोणतीही गोष्ट केल्यास आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
        वाहन मर्यादेचे पालन, जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे पालन, उमेदवारांच्या खर्चाची दैनंदिन माहिती, भित्तीपत्रके, बॅनर्स, जाहीरपत्रके यांच्यावर मुद्रक, प्रकाशक यांचे नाव आणि छपाई केलेल्या प्रतींची संख्या असणे अत्यावश्यक आहे, निवडणूक काळात उमेदवारांनी स्वताचे स्वतंत्र बॅंक अकाऊंट काढणे अत्यावश्यक आहे, त्याशिवाय, निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात पैशांची देवघेव होऊ नये यासाठी या काळात 10 लाखांपैक्षा अधिक रकमेच्या बॅंक व्यवहारावर प्रशासनाची करडी नजर असणार आहे. तर उमेदवारांच्या बॅंक खात्यातून होणाऱ्या एक लाखांपेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारावरही अधिक लक्ष राहणार असल्याचे डॉ. नारनवरे यांनी स्पष्ट केले.  त्यामुळे कोणीही अशा प्रकारे आचारसंहिता भंग करण्याचा प्रयत्न करु नये, असे त्यांनी स्पष्टपणे बजावले. 
       ज्या राजकीय पक्षांनी सार्वजनिक ठिकाणे अथवा खाजगी ठिकाणावर बॅनर्स, भित्तीपत्रके लावली असतील, त्यांनी ती काढून व पुसून टाकावीत. संबंधित मालकाच्या पूर्वपरवानगीशिवाय असे केल्याचे निदर्शनास आल्यास तो सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे विरुपण मानले जाईल. संबंधित फलक काढून घेण्याची कार्यवाही ही स्वत: राजकीय पक्ष आणि उमेदवार यांनीच करावयाची आहे.  तसे न केल्यास शासकीय खर्चाने ती करण्यात येऊन संबंधितांकडून शासकीय थकबाकी म्हणून वसूल करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
     यावेळी डॉ. नारनवरे व इतर अधिका-यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचे निरसन केले.  
 
Top