येरमाळा : महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीची धाकटी बहिण म्हणुन ओळखली जाणारी कळंब तालुक्यातील येरमाळा येथील श्री येडेश्वरीच्या दर्शनासाठी येडाईच्या दारी महाराष्ट्रासह इतर ही राज्यातून जवळपास आठ लाख भाविक भक्तांचा महापुर लोटला. आई राजा उदो ऽऽऽ उदोऽऽऽ च्या जयघोषात येरमाळा नगरी दुमदुमली आहे.
    नवसाला पावनारी श्री येडेश्वरी देवी ही महाराष्ट्रासह इतर ही राज्यात प्रसिद्ध आहे. देवीच्या यात्रा मोहत्सवाला छबीना व पालखीच्या मिरवणुकीने दि.१५ एप्रील पासुन प्रारंभ झाला.दि. १६ रोजी येडेश्वरी देवीच्या मुख्यमंदिरापासुन पालखीचे प्रस्थान अंबराईकडे झाले. देवीच्या पालखी येरमाळा गावात दाखल झाली. पालखी सोबत लाखो भाविक चुना वेचण्यासाठी चुन्याच्या रानाकडे प्रस्थान करत होते. लाखो भाविक देवीच्या पालखी सोबत हालकी, जहांज, संबळाच्या तालावर आई राजा उदो-उदोच्या जयघोषात तलीन होवून नाचत होते.
    पालखीच्या स्वागतासाठी गावातील प्रत्येक चौकात आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. अनेक ठिकाणी पालखीचे उत्स्फुर्त स्वागत होत होते. चुन्या वेचन्यापुर्वी हळद खेळणे या कार्यक्रमात भाविकांनी एकमेकांना हळद लावून आपला आनंद व्यक्त केला. पालखीचे चुन्याच्या रानात आगमन झाल्यानंतर ठाणास प्रदक्षिणा घातले.
    भाविकांनी वेचलेला चुना देवीच्या पालखीवर चुनखडीची उधळण केली. त्यानंतर पालखीचे आगमन अंबराईमध्ये झाले. यासाठी पाच दिवस पालखीचा मुक्काम राहणार आहे. या यात्रा मोहत्सवात चुनखडीचे अनन्यसाधारण महत्व आहे. पालखीचे दर्शन होणे हा भाविकांना शुभयोग मानला जातो. अंबराई येथील मंदिरात पालखी पाच दिवस राहते. या यात्राकाळात भाविकांच्या मनोरंजनासाठी पाळणे, सिनेमा टॉकीज, विविध पदार्थाचे हॉटेल्स, महिलांच्या खरेदीसाठी विविध सौंदर्य प्रसाधनाचे अनेक स्टॉल तसेच व्यवसायीकांने अनेक दुकाने थाटले असल्याने यात्रा काळात भाविकांचे उत्सहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
    चैत्र पोर्णिमा यात्रा काळात महाराष्ट्रातील इतर भाविका बरोबरच तृतीय पंथी समाजाचा वर्ग ही येडेश्वरी देवीवर श्रद्धा ठेवून मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. अफाट श्रद्धा असल्याकारणाने यात्रा काळात पालखी समोर तृतीय पंथी लोक हालकी व जहांजाच्या निनादांत बेधुन्द होवून नृत्य करतात.
    सध्या चैत्र पोर्णिमा काळात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पालखीच्या दर्शनासाठी उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील, प्रा. रविंद्र गायकवाड, दिलीप सोपल, आ. ओमराजे निंबाळकर यांच्यसह उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार वैशाली पाटील आदींसह लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिका-यांनी देवीचे दर्शन घेतले.
 
Top