उस्मानाबाद - 40- उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदानास आज सकाळी 7 वाजता सुरुवात झाली. ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी रांगा लावल्याचे चित्र दिसत होते. सकाळी 9 वाजेपर्यंत जिल्ह्यात साधारणत: 10 टक्के मतदान झाले होते. मतदानाचा हा वेग सकाळी 11 वाजेपर्यंत वाढल्याचे चित्र ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांवर पाहावयास मिळाले,
    मतदारसंघात औसा, उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद, परंडा आणि बार्शी असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात.  सकाळच्या सत्रात परंडा विधानसभा मतदारसंघात तुलनेने चांगले मतदान झाले. येथे सकाळी 9 वाजेपर्यंत 14 टक्क्यांहून अधिक तर 11 वाजता जवळपास 29 टक्के मतदान नोंदले गेले.
       उमरगा, तुळजापूर आणि उस्मानाबाद येथे सकाळच्या  पहिल्या सत्रात काहीशी धीमी गती होती. मात्र, 11 वाजेपर्यंत या विधानसभा मतदारसंघातही मतदानाची गती वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. बार्शी, औसा  या भागातही ही गती चांगली राहिली.
    सकाळी ठिक 7-15 वाजता जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी उस्मानाबाद शहरातील नगरपालिका शाळा क्र. 4 येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन मतदानाची पाहणी केली. शहरात सकाळच्या सत्रात मतदान सुरळित सुरु असल्याचे पाहायला मिळाले.
    जिल्ह्यातील संवेदनशील मतदानकेंद्रांची वेब कास्टिंगद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून पाहणी केली जात होती. सकाळी जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नारनवरे, अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, उप जिल्हानिवडणूक अधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी के.बी. कौंडेकर यांनी नियंत्रण कक्षातून या मतदान केंद्रांचा आढावा घेतला. याशिवाय, प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय माहिती घेण्यासाठी मुख्यालयात नियंत्रक अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रत्येक मतदारसंघातील माहिती या कक्षाकडून घेतली जात होती. यामुळे जिल्ह्यातील मतदान प्रक्रियेतील सर्व घडामोडींची माहिती नियंत्रण कक्षास मिळत होती. यामुळे काही ठिकाणी आलेल्या अडचणी तात्काळ त्या-त्याठिकाणी संबंधितांना सूचना देऊन सोडविण्यात आल्या. त्यामुळे संभाव्य गैरसोय टाळण्यास मदत झाली.
 
Top