उस्मानाबाद :- 40- उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत जिल्ह्यात मतदारांचा चांगला उत्साह पाहायला मिळाला. सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 55.61 टक्के मतदानाची नोंद झाली होती. उस्मानाबाद, औसा, बार्शी या ठिकाणी मतदारांत चांगला उत्साह पाहायला मिळाला. लोकसभेच्या सन 2009 च्या निवडणुकीत सरासरी 57.59 टक्के मतदान झाले होते. यावेळी सायंकाळी 5 पर्यंतच 55 टक्क्यांहून अधिक मतदान नोंदविले गेल्याने मागील निवडणुकीपेक्षा यावेळी जास्त मतदान होणार हे स्पष्ट झाले.
      सकाळच्या सत्रात मतदारांमध्ये असणारा उत्साह नंतरही कायम असल्याचे चित्र पाहायला मिळाले. दुपारी 3 पर्यंत लोकसभा मतदारसंघात 46.12 टक्के मतदानाची नोंद झाली. सायंकाळी 5 वाजता  औसा मतदारसंघात 60 टक्के, उमरगा मतदारसंघात सरासरी 51 टक्के, तुळजापूर-सरासरी 54 टक्के, उस्मानाबाद- 61 टक्के, परंडा-54 टक्के तर बार्शी येथे सरासरी 56 टक्के मतदानाची नोंद झाली.
     उमरगा, तुळजापूर आणि उस्मानाबाद येथे सकाळच्या  पहिल्या सत्रात काहीशी धीमी गती होती. मात्र, 11 वाजेपर्यंत या विधानसभा मतदारसंघातही मतदानाची गती वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. बार्शी, औसा  या भागातही ही गती चांगली राहिली.
     ढगाळ हवामान आणि पावसाचे वातावरण असतानाही मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. अनेक केंद्रावर मतदानासाठी वृद्ध नागरिक महिला यांच्यासह नवमतदारांची संख्याही लक्षणीय असल्याचे चित्र पाहायला मिळाले. जिल्हा निवडणूक यंत्रणेने स्वीप-२ कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृतीसाठी अनेक उपक्रम राबविले होते. त्याचा लाभ झाल्याचे  चित्र मतदान केंद्रांवर दिसत होते.
    जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून मतदारसंघातील विधानसभासंघनिहाय आढावा घेतला जात होता. स्वत: जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे त्यावर लक्ष ठेवून होते.  अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, उप जिल्हानिवडणूक अधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी के.बी. कौंडेकर या नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार तात्काळ कार्यवाहीच्या सूचना संबंधितांना देत होते.
जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्यासह निवडणूक आयोगाचे निरीक्षक रमेशकुमार मकाडिया यांनीही विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. मतदान निर्भयपणे व सुरळित सुरु असल्याची खात्री ते करत होते. मदत कक्षास तसेच निवडणूक विभागास ठिकठिकाणाहून आलेल्या माहितीची खातरजमा करुन संबंधित मतदान केंद्र आणि परिसरात आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात होत्या.
     ढगाळ हवामानामुळे व अंधुक प्रकाशामुळे कुठे अडचण येऊ नये यासाठी मेणबत्ती व अन्य पर्यायी व्यवस्थाही करण्यात आली होती.   
 
Top