पांगरी (गणेश गोडसे) -: लोकसभा निवडणुका लागल्या, प्रचार संपुन मतदान प्रकियाही शांततेत पार पडली. मात्र मतदान प्रकियेनंतर ज्या काही धक्कादायक व आश्‍चर्यकारक बाबी हळुहळु बाहेर पडु लागल्या असुन त्यामुळे दिवसेंदिवस निकालाच्या प्रतिक्षेमुळे वातावरण मात्र तापु लागले आहे. काही प्रसंगी कटयावरील चर्चा मुदयावरून गुदयावरही येऊ लागल्या असल्याचे पहावयास मिळत असुन नसती कटकट नको म्हणुन कांहीजण त्याच्यासमोर जाणेही टाळु लागले आहेत.
    उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीसाठी अनपेक्षितपणे चुरसीने मतदान पार पडुन मतदारसंघातील 27 विविध पक्षाच्या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. आता मतदानही संपले असुन गाव कटयावर चावडीवर व चौकाचौकात कोण जिंकणार? कोण हरणार?  कोणाचे डिपॉझिट जप्त होणार? याबरोबरच आमक्याने उभे रहायलाच नको होते, तमक्यामुळे फटका बसण्‍याची शक्यता आहे, अशा एक ना अनेक विषयांच्या चर्चेचे गु-हाळ सध्या सगळीकडेच पहावयास मिळत आहे. सुरूवातीला प्रेमात सुरू झालेल्या राजकीय गप्पा व खलबते हे शेवटी हमरीतुमरी, अरेरावी व क्‍वचिततप्रसंगी शिविगाळीपर्यंतही पोहचु लागल्या आहेत. 'दोस्त दोस्त ना रहा' अश्या गाण्याच्या ओळीही कांही जीवलग गुनगुनताना दिसत आहेत. मात्र शेवटी कधी एकदाचा निकाल लागतोय, कोणी का येईना असे म्हणुन कार्यकर्तेही आपल्या चर्चासत्राचा शेवट गोड करत आहेत. मात्र 16 मे पर्यंत कार्यकर्त्यांना आपल्या इच्छांना आवरावे लागणार असुन पारावरच्या गप्पांनाही तेव्हाच पुर्णविराम बसणार आहे.
     लोकसभा निवडणुक एैन चैत्र महिन्यात आल्यामुळे व बहुतांशजण या महिन्यात मांसाहाराचा त्याग करत असल्यामुळे तसेच विशेषताः यावेळेस कोणत्याच राजकीय पक्षाने तळीराम कार्यकर्त्यांच्या या अपेक्षा पुर्ण न केल्यामुळे त्यांनी 16 मे हा निकालाचा दिवस शुक्रवार असल्यामुळे शुभ व देवीचा माणुन किमान या दिवशी तरी गाव पुढारी आपल्याला मटन-रस्यांचा निवद दाखवतील, अशी अपेक्षा धरून आहेत. सध्या मात्र कार्यकर्ते निकाल काय लागेल, आतुन कोणी कोणाचे काम केले. बाहेरून कोणाचे दाखवले, शेवटी मतदानाच्या दिवशी जवळच्या नेत्याने कसा विरोधी पक्षाचा उमेदवार चालवला, कोणत्या दवाराने कोणत्या वजनदार नेत्याला किती खोकी पेटया दिल्या, यावेळेस सहकार्य करण्‍याच्या आश्‍वासनावर पुढील विधानसभा निवडणुकीत आर्थिक व इतर मदत करण्‍याचे आश्‍वासन कोणी कोणाला व कुठे दिले, इतर तालुक्यांच्या तुलनेत आपल्या भागातील बुथला व कारभा-यांना वरून पैसै कसे कमी आलेत, असा एक ना अनेक बाबी समोर आल्यामुळे गावकारभारीही यावर चवीने चर्चा करताना दिसत आहेत. काही कार्यकर्ते व मतदारांना विजयी उमेदवार घोषीत होण्‍याच्‍या अगोदरच स्वप्ने पडुन त्यांचाच उमेदवाराला गुलाल लागल्याचा भास होताना दिसत आहे. तर कांही मतदारांना आपण उगीचच चुकीच्या उमेदवाराला मतदान केल्याचा साक्षात्कार होऊ लागला आहे. गावकटयावरील चर्चेने आता कांहीही साध्य होणार नसले तरीही आधुनिक मिडीयाच्या साधनामुळे गावचावडीवरील कार्यकर्त्यांनाही दिल्लीची खबर क्षणार्धात होते.
   सोळाव्या लोकसभेत जाण्‍यासाठी आपले नशिब आजमावत असलेल्या उमेदवारांचा जीव 16 मे ला काय होणार? या काळजीने टांगणीला लागला आहे. तसेच ब-याच उमेदवारांच्या निवडणुक खर्चाचा ताळमेळ अद्याप लागला नसुन वाहनांची भाडी यासह कार्यकर्त्यांनी केलेली पदरमोड याचा हिशोब देणे मागे असुन कार्यकर्ते नेत्यांना फोन करून भेटण्‍यास कधी येऊ असे विचारत आहेत. तर नेते मात्र त्यांना बेरजेत घेताना दिसुन येत नाहीत. 'गरज सरो वैद्य मरो' अशीच कांहीशी अवस्था या वाहनचालक व स्वयंघोषित कार्यकर्त्यांची झाल्याचे दिसत असुन किमान आम्ही केलेल्या रात्रीच्या दिवसाची तरी आठवण ठेऊन आमची देणी द्यावीत असे बोलले जात आहे.
  ज्या त्या तालुक्यातील लोकप्रतिनिधी व विरोधी पक्षाचे नेते मात्र सध्या तालुक्यातुन झालेले मतदान व त्‍यातून आपल्या पक्षाच्या उमेदवाराला पडणारे मतदान किती असेल? याचा ताळमेळ लावत आहेत. असे-तसे झाले तर सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या व डोहाळे लागुन राहिलेल्या विधानसभा निवडणुकीचे आपले स्वप्न कसे पुर्ण होऊ शकते? यावर खलबते करून मानसिक समाधान मानुन कार्यकर्त्यांना झुलवत ठेवण्‍याचा प्रयत्न करत आहेत. तसेच लग्न, बारसे यासह साध्या साध्या व किरकोळ सण समारंभ व कार्यक्रमांना हजेरी लावुन समाजात मिसळण्‍याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
 
Top