मुंबई :- मतदान केंद्रानुसार मतमोजणी केल्यामुळे मतदानाच्या गोपनीयतेला धक्का बसतो. यामुळे मतदान केंद्रानुसार मतमोजणी करण्यात येऊ नये, अशी विनंती करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते अविनाश गाजणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. न्यायमूर्ती अभय ओक आणि ए.ए.सय्यद यांच्या खंडपीठासमोर दि. 5 मे रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
       मतदान केंद्रानुसार मतमोजणी झाल्यास कोणते दुष्परिणाम होतील, याकडे याचिकाकर्त्यांचे वकील अगस्ती विभुते आणि पंकज सुतार यांनी लक्ष वेधले. मतदान केंद्रानुसार मतमोजणी झाल्यास कोणत्या मतदान केंद्रात किती मते मिळाली याची माहिती राजकीय नेत्यांना मिळते. आपले प्रभावक्षेत्र कोणते आणि विरोधकाचे प्रभाव क्षेत्र कोणते याचा उलगडा होतो. विरोधकांचे प्राबल्य असलेल्या क्षेत्राकडे दुर्लक्ष करण्याचा राजकीय नेत्यांचा कल असतो. राजकीय वैमनस्य ठेवून अशा भागाकडे नेते कमी लक्ष देतात. याचा परिणाम मतदाराच्या सार्वभौमत्वावर होतो. याचा विचार करून लोकसभा निवडणुकाला स्थगिती द्या आणि मतदान केंद्रानुसार मतमोजणीची पद्धत बंद करा, अशी विनंती याचिकेद्वारे करण्यात आली आहे. मतदान केंद्रानुसार मतमोजणी करण्याच्या मुद्द्यावर पाच मे रोजी सुनावणी होणार आहे.
 
Top