पांगरी (गणेश गोडसे) :- पुणे - लातुर राज्यमार्गावरील टेंभुर्णी ते येडशी या 93 किलो मीटर अंतराच्या टप्प्याच्या रूंदीकरणाच्या कामाची निविदा पुणे येथील कंपनीने घेऊन मोठा कालावधी मध्यंतरी जाऊनही प्रत्यक्ष कामकाजाचा अद्याप श्रीगणेशा झाला नसल्यामुळे घोड नेमक कुढे अडलं? अशी चर्चा सुरू आहे.
    रूंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या कामांच्या पुर्ततेसाठी गत वर्षभर गती घेतली आहे. आवश्यक सर्व बाबींची पुर्तताही करण्‍यात आली असुन आचारसंहितेचा फटका बसुन फक्त कामाची वर्क ऑर्डर बाहेर पडु न शकल्यामुळे काम रखडल्याचे खात्रीलायक वृत्त असुन लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर ऑर्डर मिळाल्यास तात्काळ प्रत्यक्ष कामास सुरूवात होईल असे संबंधीत अधिका-यांनी सांगितले होते. लोकसभेची आचारसंहिता संपल्यातच जमा असुन अनेकांचे डोळे या रस्त्याच्या रूंदीकरणाकडे लागले आहेत. अनेकांची नवीन बांधकामांची कामेही रखडलेली आहेत. या मार्गावरील शेतक-यांच्या जमीनी व मोठमोठया इमारती, शाळा यासह शासकीय वास्तुंनाही या रूंदीकरणाच्या कामात हानी पोहचण्‍याच्‍या भितीने अणेकजन धास्तावले असुन रस्ता मोठा होऊन अपघाताच्या संख्येत घट होणार असल्यामुळे वाहनधारकांसह सर्वसामान्यांमधुन मात्र समाधान व्यक्त केले जात आहे. अनेक वर्षांपासुन रखडलेला रूंदीकरणाचा प्रश्‍न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशीही वाहनधारकांची मागणी आहे.
       यासंदर्भात अधिक माहिती अशी की, दळणवळणाच्या दृष्टीने सोय होण्‍यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व प्रशासनाने टेभुर्णी ते येडशी या 93 कि.मी.अंतराच्या राज्य मार्गाचे केंद्र शासन, राज्य शासन व संबंधीत ठेकेदार यांच्या संयुक्त माध्यमातुन बांधा वापरा व हस्तांतरीत करा या धोरणावर चौपदरीकरण करण्‍याचा निर्णय घेतला होता. या मार्गाच्या रूंदीकरणाच्या कामासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे वारंवार निविदाही प्रसिध्द केल्या होत्या. मात्र अनेकवेळा निविदा प्रसिध्‍द होऊनही ठेकेदारांकडुन या मार्गाच्या कामासाठी म्हणावा असा प्रतिसाद मिळत नव्हता. चौपदरीकरणासाठी होणारा खर्च अफाट असल्यामुळे ठेकेदारांमधुन उदासिनता दिसत होती. मात्र पुणे येथील एका खाजगी कंपनीने टेंभुर्णी ते येडशी दरम्यानच्या रस्त्याच्या रूंदीकरण कामाचा ऑक्‍टोबर 2013 मध्येच रस्ते रूंदीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात करण्‍याचा मुहुर्तही काढण्यात आला होता. मात्र माशी कुठे शिंकली व आठ महिन्यांचा कालावधी उलटुन जावुनही अद्याप या विषयाला मुर्त स्वरूप आलेले नाही.
   संबंधित कंपणीच्या कर्मचा-यांकडुन बार्शी पांगरी ते येडशी मार्गादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुळ मालकीच्या जागेच्या स्थान निश्‍चीतीचे काम सुरू करून ते पुर्णही करण्‍यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर अनेकांनी आपली बांधकामे थाटल्याचे सध्याच्या सर्वेक्षणातुन दिसत असुन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेची हद्द अनेकांच्या मोठमोठया बांधकामाच्याही पाठीमागे गेल्या असल्याचे निदर्शनास येत आहे. रूंदीकरणासाठी प्रत्यक्षात शासन किती जागा ताब्यात घेणार हे मात्र प्रत्यक्ष कामास सुरूवात झाल्यानंतरच समजणार आहे. सध्या सुरू असलेल्या सर्वेक्षणात वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळी मापे घेऊन स्थान निश्‍चीती करण्यात येत असल्यामुळे मात्र जनतेमधुन तर्क वितर्क लढवले जात आहेत.
         या मार्गावरूण दैनंदीन साडे तीन हजार वाहनांची आवक जावक होत असल्याचे सर्वेक्षणातुन सिध्‍द झालेले असल्यामुळे व भविष्यातील वाहनांची संख्या लक्षात घेऊनच शासनाने या मार्गाच्या रूंदीकरणाचे काम हाती घेतलेले आहे. हा रस्ता वाढुन दहा मिटर रूंद डांबरीकरण व साइडपटया असा होणार असल्याचे समजते. रस्ता रूंदीकरणाच्या कामाची फाइल मंत्रालय पातळीवर कांही तां‍त्रिक बाबींच्या पुर्ततेसाठी असल्याचे बार्शी बांधकाम विभागाने भ्रमनध्वनीवरुन बोलताना सांगितले. मात्र खरे वास्तव हे रस्त्याच्या प्रत्यक्ष रूंदीकरणाच्या कामास सुरूवात झाल्यानंतर व जागा ताब्यात घेतल्यानंतरच समोर येणार आहे. प्रत्यक्ष रोड किती होणार या विचाराने अनेकांचा जिव अक्षरक्षः टांगनीला लागला आहे. या मार्गाच्या रूंदीकरण कामाच्या पुर्ततेनंतर इतर अनेक मार्गावरील वाहतुक या रस्त्याने वळणार असुन येथील वाहतुकीच्या प्रमाणात मोठी वाढ होणार आहे. या भागात दळणवळणाच्या सुविधा वाढल्यामुळे पर्यायाने या भागाचा विकास साधन्यास मोठी मदतही होणार आहे.
शेतक-यांच्या जमिनीच्या मावेजाचे काय?:
    शासनाकडुन असो अथवा खाजगी कंपनीकडुन शेतक-यांच्या शेतात दुरवर हद्दीखुना निश्‍चित करण्‍यासाठी दगड लावुन व त्यांची रंगरंगोटी करूण सिमा निश्‍चित केली जात आहे. दगडांची हद्द अनेकांच्या बंगले घरांच्याही पाठीमागे गेलेली असुन त्यांच्या जमिनी जागा ताब्यात घेतल्यानंतर संबंधीतांना त्याचा मावेजा मिळणार का? असा प्रश्‍न संबंधित जागामालकांकडुन विचारला जात आहे. यासंदर्भात संबंधिताकडे कोणतीच चौकशी अथवा विचारपुसही केली जात नसल्यामुळे अनेक वर्षांपासुन पिठया वाढलेल्या घरमालकांमधुन आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. कारण 1972 च्या दुष्काळात पांगरी भागात झालेल्या पांगरी ते पाथरी या रस्त्यासह बार्शी तालुक्यात तात्काळात झालेल्या रस्त्यांचा शेतक-यांना चाळीस वर्षांचा कालावधी उलटुन जावुनही अद्यापर्यंत मावेजा अदा करण्‍यात आलेला नाही. त्यामुळे टेंभुर्णी-लातुर रूंदीकरणाचे पैसै अगोदरच वाटप करावे, अशी या मार्गावरील शेतक-यांची मागणी आहे.
अनेकांना धास्तीः
    टेंभुर्णी-येडशी रस्त्याच्या रूंदीकरणाचा काम सुरू होणार असल्यामुळे रस्त्यालगत दुकाने, घरे असणा-या अनेकांना मात्र धडकी भरली असुन अतिक्रमानात आपली घरे दुकाने उध्वस्त झाल्यास पुढे काय? असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा राहीला आहे. अनेकांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळणार आहे.
 
Top