उस्मानाबाद :- जिल्ह्यात महाराष्ट्र विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदार संघाची द्वैवार्षीक निवडणूक प्रक्रिया, पोलीस भरती, शिवराज्यभिषेक सोहळा, वटसावित्री पोर्णिमा हे कार्यक्रम लक्षात घेता जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी संजय गायकवाड  यांनी  मुंबई पोलीस  अधिनियम 1951 चे कलम 37 (1)  (3) अन्वये  संपुर्ण जिल्हयात 31 मे ते 14 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केले आहेत.
       त्यानुसार, शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्तीखेरीज अन्य कोणत्याही व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी किंवा सडकेवर किंवा जवळपास शस्त्र, लाठया काठया, बंदुका, तलवारी, चाकू, रिव्हॉल्व्हर आदि जवळ बाळगता येणार नाही. शारिरीक इजा करणा-या वस्तु जवळ बाळगता येणार नाही. कोणतेही क्षार, द्रव्य पदार्थ, स्फोटके जवळ बाळगता येणार नाही. दगड, क्षेपणास्त्रे आदि जवळ बाळगता व वाहून नेता येणार नाही. आवेशी भाषणे, अंगविक्षेप, विडंबनात्मक नकला करता येणार नाही. सभ्यता किंवा नितीमत्तेस बाधा येईल अशी किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, नकाशे, घोषणा फलके, चिन्हे किंवा कोणतीही वस्तु जवळ  बाळगता येणार नाही, व्यक्ती किंवा त्यांच्या प्रतिकृतीचे / प्रतिमांचे प्रदर्शन करता येणार नाही. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणूनबुजून दुखविण्याच्या उदेशाने वादय वाजवता येणार नाही किंवा  गाणी म्हणता येणार नाहीत. जाहीरपणे प्रक्षोभक किंवा असभ्य वर्तवणूक करता येणार नाही.
      कोणत्याही सडकेवर किंवा सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्रित येण्यास किंवा सभा घेण्यास, मिरवणूका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. शासकीय कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, कर्मचारी  किंवा शासनाचे अधिकारी,  कर्मचारी, अत्यंयात्रा, धार्मिक कार्यक्रम यास हे आदेश लागू राहणार नाहीत.  वरील कालावधीत मिरवणूकींना /सभांना परवानगी देण्याचे अधिकारी पोलीस अधीक्षक, उप विभागीय पोलीस अधिकारी व संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षकांना राहतील. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. हे आदेश जारी करण्यात आले आहेत. 
 
Top