उस्मानाबाद :- येत्या खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता लक्षात घेऊन गावक-यांना घरगुती बियाणे योग्य बीजप्रक्रियेसह वापरण्याबाबत स्वत: जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्यासह वरिष्ठ कृषी अधिका-यांनी प्रत्यक्ष गावात मुक्काम करुन  मार्गदर्शन केले. केवळ कृषी विषयकच नाही तर सर्व शासकीय यंत्रणांशी असलेल्या ग्रामस्थांच्या तक्रारी त्यांनी जाणून घेतल्या. कळंब तालुक्यातील वाठवडा या गावात डॉ. नारनवरे यांच्यासह या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चक्क मुक्काम ठोकला आणि ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला. प्रशासनाचा प्रमुखच गावात आल्याने ग्रामस्थांनीही आनंद व्यक्त केला.
       जिल्हा प्रशासन सध्या खरीप हंगाम पूर्वतयारी करीत आहे. विविध बियाणे, खते, कीटकनाशके यांचा आढावा वेळोवेळी घेतला जात आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे मोठे पेरणीक्षेत्र आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक बियाण्यांचा तुटवडा लक्षात घेऊन शेतक-यांमध्ये घरगुती बियाणे योग्य त्या बीजप्रक्रियेसह वापरण्याबाबत जागरुकता केली जात आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जि.प. चे कृषि विकास अधिकारी मदनलाल मिणीयार हे अधिकारीही उपस्थित होते. याशिवाय, जिल्हा ग्रामीण यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रुपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) टी.के. नवले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शीतलकुमार मुकणे, अग्रणी बॅंक व्यवस्थापक श्री. दुपारगुडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे कार्यकारी व्यवस्थापक हनुमंत भुसारे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. तांगडे, तहसीलदार वैशाली पाटील, गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर, उपविभागीय कृषी अधिकारी आर. टी. जाधव, तालुका कृषी अधिकारी महारुद्र मोरे, कृषी सहायक आदी यावेळी त्यांच्या समवेत होते.
      शुक्रवारी रात्री ठीक 9-30 वाजता जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांचे गावात आगमन झाले. ग्रामस्थांच्या वतीने सरपंच विद्याताई जनक पुंड यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अण्णासाहेब टेकाळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी येणार याची उत्सुकता गावकऱ्यांमध्ये होती. त्यामुळे रात्रीही ज्येष्ठ नागरिक , तरुण आणि  महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. डॉ. नारनवरे यांच्या उपस्थितीतच सर्वांना सोयाबीनचे घरगुती बियाणे कशा पद्धतीने वापरायचे, त्यासाठी कोणती काळजी घ्यायची हे कृषी अधिका-यांनी प्रात्यक्षिकांसह दाखविले. ग्रामस्थांच्या याबाबतच्या शंकांचेही यावेळी निरसन करण्यात आले.
         त्यानंतर डॉ. नारनवरे यांनी थेट ग्रामस्थांशी संवाद साधला. गावक-यांची एकी हे गावच्या विकासाचे मुख्य कारण आहे. त्यामुळे विकासासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.शासनाच्या विविध विकासाच्या योजना राबविण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा सहभाग अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने गावनियोजन करा. आपले गाव निर्मल असले पाहिजे, तंटामुक्त, पर्यावरण संतुलित असले पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विविध योजनांचा एकत्रित लाभ घेण्याच्या दृष्टीने गावक-यांनी नियोजन केले तर विविध यंत्रणांच्या माध्यमातून गाव स्वयंस्फूर्त होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
    गावात स्वच्छता अभियान राबवा, असे निर्देश त्यांनी दिले. मागील वर्षी दुष्काळ आणि त्यानंतर गारपीटीने जिल्ह्याला तडाखा बसला. त्यासाठी शासनाची आलेली मदत वाटप करण्यात येत आहे. ग्रामस्थांनी स्वताहून आधुनिक शेतीकडे वळावे, गटशेती सारखे उपक्रम राबवावेत, शेतीपूरक जोडधंदे करावेत, असे त्यांनी सुचविले.
        विविध शासकीय यंत्रणांविषयी काही तक्रारी असतील तर थेटपणे सांगा अथवा लिखीत स्वरुपात द्या, असे आवाहन डॉ. नारनवरे यांनी केले. ग्रामस्थांच्या अडचणी त्यांनी समजावून घेतल्या. काहींना लेखी तक्रार देण्यास सांगितले. तुमच्या अडचणी निश्चितपणे सोडविल्या जातील, असा विश्वास दिला. ग्रामस्थांनी यास टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
       रात्री डॉ. नारनवरे यांनी बैठक संपल्यानंतर ग्रामस्थाबरोबरच पिठलं-भाकरी आणि ठेचा असा ग्रामीण जेवणाचा आस्वाद घेतला. त्यांच्या या साधेपणामुळे गावकरीही आनंदले. ख-या अर्थाने प्रशासन जनतेच्या दारी उपक्रम यशस्वी झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
   दरम्यान सुरुवातीला मिणीयार, तोटावार, श्रीमती सातपुते यांनी कृषी तसेच निर्मल भारत अभियानाविषयी माहिती दिली.    
 
Top