उस्मानाबाद :- रेशीम उद्योग करुन लहान शेतक-यास आर्थिक उन्नत्ती साधता येते . तुती लागवड करुन रेशीम कोष उत्पादीत करून जिल्ह्यातील शेतक-यांनी स्वताची उन्नती साधावी, असे आवाहन सहकार व वस्ञोद्योग विभागाचे सहसचिव सुधीर कुरसंगे यांनी कळंब तालुक्यातील निपाणी  येथिल शेतकरी मेळाव्यात केले.
     जिल्हा रेशीम कार्यालय उस्मानाबादच्या वतीने शुक्रवारी निपाणी येथे रेशीम उत्पादक शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. कुरसुंगे बोलत होते. प्रादेशिक रेशीम कार्यालयाचे सहायक संचालक श्री दिलीप हाके, रेशीम विकास अधिकारी पी. एस. गणाचार्य आदी उपस्थित होते.
         यावेळी कुरसुंगे म्हणाले की, जास्तीत जास्त अल्पभुधारक शेतक-यांनी रेशीम उद्योगाकरीता नोंदणी करुन प्रती एकरी कमी खर्चात हमखास जास्त उत्पन्न मिळवुन देणारा रेशीम उद्योग करुन आपली आर्थिक उन्नत्ती साधावी व जीवनमान उंचवावे. रेशीम उद्योग करणा-या शेतक-यांना जास्तीत जास्त फायदा करुन देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तुती लागवडीपासुन उत्पादीत रेशीम कोष विक्री शेतकरी करतात. यापुढे उत्पादीत कोषापासुन छोटया रीलींग युनिटद्वारे रेशीम धागा निर्मिती करुन धाग्याची विक्री केल्यानंतर आपणास जास्त फायदा घेता येईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत.
      हाके यांनी, उस्मानाबाद जिल्हयातील शेतक-यांच्या कोषाला चांगल्या प्रतीमुळे देशात उच्चतम दर मिळाल्याचे सांगुन शेतक-यांचे व कार्यालयाचे अभिनंदन केले. तसेच रेशीम विकास अधिकारी गणाचार्य यांनी शेतक-यांचे दरमहा चर्चासत्र आयोजित करुन मार्गदर्शन व रेशीम तंत्रज्ञानाची  देवाण-घेवाण करुन उच्चप्रतीचे जास्तीत जास्त कोष उत्पादन केल्याबद्दल त्यांचे व कार्यालयाचे श्री इप्पर, डिगूळे, पानसरे, जोजन, माने यांचे अभिनंदन केले.
        यापुढे 25 एकर तुती लागवडी साठी एक सुक्ष्म बाल कीटक संगोपन केंद्र स्थापनेस शासन मंजुरी देणार आहे. शेतक-यांनी दर्जेदार पाला उत्पादनासाठी तुती बागेस शेणखत व गांडुळ खत देण्यावर भर दयावा. लातुर येथिल रू 3.50 कोटी खर्च करुन बांधलेले रेशीम संकुल महीनाभरात ताब्यात घेवुन तेथे सर्व उपक्रम सुरु करण्यात येणार आहेत असेही त्यांनी सांगितले.
      या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणाचार्य यांनी केले. त्यात त्यांनी शासन व रेशीम उद्योजक यांनी प्रत्येकांनी आपली कर्तव्य पार पाडुन रेशीम वाढवुन त्याद्वारे दिनदुबळया शेतक-यांची आर्थिक उन्नत्ती कशी साधता येईल ते एका गोष्टी रुपाने  शेतक-यांना समजावून सांगितले.
       या कार्यक्रमात आत्मा योजनेंर्तगत सन 2013-14 मध्ये 100 अंडीपुजास सरासरी जास्त कोष उत्पादन व सर्वात जास्त कोष उत्पादन घेणारे जिल्हयातील शेतकरी बापु माळी रा. माणकेश्वर, श्रीहरी जाधवर रा. ताडगाव, बापु बनगर व दादा इंगळे,  रा. माणकेश्वर तसेच माहे मार्च 2014 मध्ये  100 अंडीपुंजास सरासरी जास्त उत्पन्न घेणा-या सौ कस्तुरबाई गुंड रा. निपाणी या सर्व शेतक-यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. या मेळाव्यात  रेशीम उद्योगात महत्वाची भुमिका बजावणा-या  महिलांची उपस्थिती उल्लेखनिय होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाबासाहेब निपाणीकर यांनी केले तर आभार वाठवडा येथिल शेतकरी शरद पवार यांनी मानले.
 
Top