उस्मानाबाद :- वेळ सकाळी सातची.  ग्रामस्थांची सकाळची कामे उरकण्याची लगबग सुरु असते. एवढ्यात, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे पोहोचतात. थेट ग्रामपंचायत कार्यालयात. तेथून ग्रामस्थ आणि अधिका-यांसह गावातील गल्लीबोळांतून सुरु होते, ती प्रभातफेरी. उत्सुकतेने बघणारे तरुण, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक एकेक करीत मागे येत राहतात. एका ठिकाणी कच-याचा ढीग पाहून जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे थबकतात. हातात झाडू घेतात आणि स्वच्छता मोहिमेला सुरुवात होते. आपणच आपले गाव स्वच्छ ठेवले पाहिजे असा संदेश देत साफसफाई सुरु होते. मग अधिका-यांसह ग्रामस्थांच्या हातीही झाडू येतो आणि ही मोहिम गती घेते.
       शनिवारी सकाळी असणारे वाशी तालुक्यातील तेरखेडा गावचे हे चित्र! डॉ. नारनवरे यांनी जिल्ह्यात स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही मोहीम राबविण्यात आली. त्याचबरोबर सोयाबीन बियाणे पूर्वनियोजन आणि खरीप पूर्वनियोजनाबाबतही ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जि.प. चे कृषि विकास अधिकारी मदनलाल, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शीतलकुमार मुकणे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. तांगडे, तहसीलदार श्री. गोरे, तालुका कृषी अधिकारी गोपाळ शेरखाने यांच्यासह सरपंच जितेंद्र सरवदे, उपसरपंच घोलप, अण्णासाहेब खामकर आदी यावेळी त्यांच्या समवेत होते.
      सकाळीच जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी वाठवडा, ता. कळंब येथील मुक्काम आटोपून तेरखेडा येथे जाण्याचा निर्णय घेतला. तेरखेडा आल्यानंतर त्यांनी त्यांनी ग्रामस्थांसह परिसराची संपूर्ण पाहणी केली. ठिकठिकाणी दिसणारे कच-याचे ढीग, अस्वच्छ गटारी याबद्दल त्यांनी ग्रामस्थांना चांगलेच बोल सुनावले. जे नागरिक कचरा टाकून परिसर अस्वच्छ करतील, त्यांना ग्रामपंचायतींनी दंड ठोठवावा, असे निर्देश त्यांनी दिले. निर्मल भारत अभियान, तंटामुक्ती, पर्यावरणसंतुलित समृद्ध गाव अशा योजना राबवल्या तर गावविकास होईल. त्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली.
       गावच्या योजना मार्गी लागत नसतील किंवा लोकांचा सहभाग मिळत नसेल तर त्याबाबत वेगळा विचार करावा लागेल, असे त्यांनी सुनावले.
      त्यानंतर त्यांनी खरीप हंगामाबाबतची तयारी, कृषी विभाग करीत असलेले प्रयत्न याची माहिती दिली. ग्रामस्थांच्या तक्रारी जाणून घेतल्या. 
श्री. तोटावार आणि श्री. मिणीयार यांनी ग्रामस्थांना सोयाबीन बीजप्रक्रियेची तपशीलवार माहिती दिली. डॉ. मुकणे यांनी पावसाळ्यात जनावरांच्या घ्यावयाच्या काळजीबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी श्री. शेरखाने यांनी खरीप हंगाम पूर्वतयारीबाबत जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेला कृषी रथ सर्व गावात फिरवणार असल्याचे सांगितले.
 
Top