उस्मानाबाद : राज्यात अवैध दारू व अवैध धंद्याच्या तक्रारी कमी आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र या तक्रारी वाढलेल्या दिसतात. हे अवैध धंदे व दारू बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व राज्य उत्पादन शुल्क विभागांना संयुक्त मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्थानिक पातळीवर त्यांनी कारवाई न केल्यास बाहेरच्या जिल्ह्यातील पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.
    कनगरा येथे आल्यानंतर पत्रकारांनी त्यांना विविध प्रश्न विचारले असता ते म्हणाले, कनगरा प्रकरणात वरिष्ठांनी गंभीर चुका केल्या आहेत. म्हणूनच त्यांच्यावर कारवाई होईल. यातून पोलिसांना एक संदेश जाईल व अधिकार, कायदे यामध्ये निरपराधांना मारणे बसत नाही हे लक्षात येईल. पोलिस स्टेशनला माहिती देऊनही कारवाई होत नाही हे चुकीचेच आहे. मात्र त्यासोबतच जनतेलाही पोलिसांवर हल्ला करण्याचा अधिकार नाही. राज्यात अवैध दारूच्या तक्रारी फार कमी आहेत. या जिल्ह्यात अवैध दारूमुळे हा गंभिर प्रकार घडला. जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी संयुक्तपणे एक मोहिम राबवून हे अवैध दारू धंदे व इतर धंदे बंद करावेत अशा सुचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही या अवैध धंद्यासंदर्भात पुढे येऊन तक्रार करायला हवी. स्थानिक पोलिसांकडून अवैध धंदेवाल्यांवर कारवाई न झाल्यास गृहविभागाकडे तक्रार करा. बाहेरच्या पोलिसांमार्फत त्या अवैध धंद्याविरूद्ध कारवाई केली जाईल आणि त्यानंतर मात्र जेथे कारवाई केली तो भाग ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहेत त्या ठाण्याच्या प्रमुखाला कठोर शासन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.
    गडचिरोली येथे नक्षलवाद्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्‍यांच्या केलेल्या हत्येसंदर्भात गृहमंत्री म्हणाले, गडचिरोली नक्षलवाद्यांविरूद्ध एक लढाई सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने केलेल्या कारवाईत अनेक नक्षलवादी मारले गेले. त्यांचेच नक्षली प्रयत्न हाणून पाडले गेले. त्या वैफल्यातुन नक्षलवादी हल्ले करत आहेत. परंतू त्यांच्या विरूद्ध शासनाने एक ऑपरेशन सुरू केले आहे. त्यामुळेच नक्षलवाद आटोक्यात आला आहे. गडचिरोलीत झालेल्या या प्रयत्नाचे मॉडेल म्हणून देशपातळीवर कौतुक होत आहे ते म्हणाले.
    गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज कनगरा भेटीत पोलिस महा-निरिक्षकांना वरिष्ठापासून कनिष्ठापर्यंत मारहाण करणा-या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी घराची दारे तोडून घरात घुसून मुले, महिला, वृद्धांसह सर्वांना झोडपले. अनेक जण कायमचे जायबंदी झाले. ५४ जण जखमी झाले. एकाच्या गुडघ्याची वाटी फुटली. यावरून घराची दारे तोडणे दरोड्याचा प्रयत्न, दारे तोडून घरात घुसून मारणे अवयव निकामी होईल एवढी गंभीर इजा करणे म्हणजे खुनाचा प्रयत्न, सामूहिक हल्ला करणे अशा गंभीर प्रकरणाचे गुन्हे पोलिसांवर दाखल होऊ शकतात. याचा अर्थ पोलिसांनी सामान्य कनगरा वासीयांवर जी कलमे लावली ती ३०७, ३९५, ३२३, ३२४, ३३२, ३३३ ही कलमे आता पोलिसांच्या राशीला येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
Top