उस्मानाबाद :- ज्या ग्राहकांना जादा वीज देयके देण्यात आली ते दुरुस्ती करण्यात यावी. वीजपुरवठा सुरळीत ठेवून नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीने काम करण्याच्या सूचना राज्याचे परिवहनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी महावितरणच्या अधिका-यांना दिल्या.
         तुळजापूर येथील सर्कीट हाऊसवर वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांची पालकमंत्री चव्हाण यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. पापडकर, कार्यकारी अभियंता इ.व्ही. मामीलवाड, सर्व सहायक अभियंता, तुळजापूर विकास प्राधिकरणाचे सदस्य आप्पासाहेब पाटील, जि.प. सदस्य, काशिनाथ बंडगर, अॅड. धीरज पाटील, जि.प. कृषी सभापती पंडित जोकार, तुळजापूर पं.स. चे उपसभापती प्रकाश चव्हाण, तहसीलदार काशीनाथ पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
    पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, वीज मंडळाने विनाकारण वीज पुरवठा खंडीत होणार नाही, याची दक्षता घ्यावी. खंडीत वीज पुरवठा तात्काळ सुरु करावा. अवकाळी पाऊस, गारपीठीमुळे वीजेचे खांब पडले आहेत, ते पुन्हा उभारुन वीज पुरवठा सुरळीत करावा. ज्या गावात नवीन डीपीची मागणी आहे तेथे नवीन डीपीची उभारणी करावी. शेतक-यांना शेतीसाठी पाणी लागते मात्र  वीजेअभावी ते मिळत नाही, तेव्हा संबंधित यंत्रणेने लक्ष घालून शेतकऱ्यांचा वीज पुरवठा पुर्ववत सुरु ठेवण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
     कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचा-यांची गय केली जाणार नाही. संबंधितावर कार्यवाही करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश संबधित यंत्रणेला दिले.
 
Top