कळंब -: श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या पालखीचे उस्मानाबाद जिल्ह्याच्या हद्दीत मांजरा नदीच्या पुलाजवळ  कळंब शहरानजीक भक्तांनी अभूतपुर्व स्वागत केले. ही दिंडी शहरात दाखल होताच नगराध्यक्ष शिवाजी कापसे यांनी या पालखीचे पूजन करुन, मानक-यांचा सत्कार केला. यावेळी विठ्ठल नामाच्या गजराने कळंब नगरी दुमदुमन गेली होती.
      बीड जिल्ह्यातून गुरूवार (दि.२६) रोजी कळंब शहरात सायंकाळी या दिंडीचे आगमन झाले. यावेळी शहर व पंचक्रोशीतील गजानन भक्तांनी या पालखीचे अभूतपुर्व स्वागत केले. व्दारकानगरीपासून, शहरापर्यंत भाविक भक्तांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती तर अनेक दानशूर व्यक्तींनी यावेळी खाऊचे वाटप केले.
      शेगावच्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यात अनेक वर्षापासून अबाल वृध्दांचे आकर्षण ठरलेल्या हत्तीणीचा मृत्यू झाल्याने, या वर्षीच्या पालखीत ती न दिसल्याने भाविक भक्तात चर्चा होती. हत्तीन नसल्याने, या पालखी सोहळ्यात या वर्षीपासून तीन अश्वांचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रतीवर्ष्याप्रमाणे संध्याकाळी करंजकर परिवाराच्या वतीने आरती करण्यात येउन अन्नदान करण्यात आले , कळंब येथील जि.प.मुलांच्या शाळेत या पालखीचा मुक्काम असतो, कळंबमधून दि. २७ रोजी पहाटे पाच वाजता या दिंडीचे ढोकीकडे प्रयाण झाले, या पालखी सोबत चार पोलीस निरीक्षक, पाच पोलीस उपनिरीक्षक, ४७ पोलीस कर्मचारी, अकरा महिला कर्मचारी, साध्या वेशातील दहा कर्मचारी व रुग्णवाहिकेसह चार वाहने ठेवण्यात आली आहेत.
 
Top