बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- सोशल मिडीयाचा वापर करुन डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्‍या प्रतिमेचा अवमान केल्‍याप्रकरणी बार्शी येथे बहुजन समाज पार्टी, आरपीआय, शिवसेना, कॉंग्रेसच्‍या पदाधिका-यांनी एकत्रितपणे निषेध करुन पोस्‍ट ऑफिस चौक येथे रास्‍ता रोको केले. यावेळी पोलीस निरीक्षक सालार चाऊस यांना कारवाई करण्‍याबाबतचे निवेदन देण्‍यात आले.
 
यावेळी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, दादा गायकवाड, आण्‍णा शिंदे, दिपक आंधळकर, बाबासाहेब कापसे, देवेंद्र कांबळे, तानाजी बोकेफोडे, विरेंद्र कांबळे, श्रीधर कदम, अशोक बोकेफोडे, अॅड. अविनाश गायकवाड, विजय भोसले आदी उपस्थित होते.
    याप्रसंगी बोलताना भाऊसाहेब आंधळकर म्‍हणाले की, जनतेनी कॉंग्रेसच्‍या सरकाराला उलथवून टाकत मोदींचे सुशासन आणले आहे. त्‍याचा राग मनात धरुन तसेच आगमी विधानसभेवर डोळा ठेवून काही समाजकंटकानी जातीजातींमध्‍ये तेढ निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न सुरु केला आहे. समाजात असंतोष व दुही माजविण्‍याचे कारस्‍थान केले जात असून यापासून लोकांनी जागृत राहावे. अशा प्रकारचे कृत्‍य करणा-या अपराध्‍यांना मोक्‍कासारख्‍या कायद्याचा वापर करुन कठोर शासन करण्‍या यावे, त्याप्रकारचे कायदे तयार करण्‍याचे सांगून लोकांनी शांत राहण्‍याचे आवाहन यावेळी करण्‍यात आले.
    रविवारी सकाळी बार्शी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍याबद्दल विटंबनात्‍मक लिखाण व चित्र तयार करुन सोशल मिडीयावर बदनामी केल्‍याची वार्ता पसरल्‍याने तीव्र पडसाद उमटले. संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून व्‍यापा-यांनी निषेध नोंदविला.
    सकाळी नऊच्‍या दरम्‍यान सोलापूर रोडवरील रेल्‍वे पूलाजवळ एम.एच. 12 सी.एच. 6296 या बसच्‍या काचा फोडण्‍यात आल्‍या. या दगडफेकीत एक प्रवासी किरकोळ जखमी झाला. त्‍यानंतर लातूर-मेढा एम.एच. 40 - 8345, कळंब-बार्शी एम.एच. 20 डी. 9914 या एस.टी. बसवर झालेल्‍या दगडफेकीने काचा फुटल्‍या. यानंतर शहरातील बस वाहतूक ठप्‍प झाली.
    बार्शी आगाराच्‍या सर्व बसची वाहतूक थांबविण्‍यात आली. इतरही आगारातील आलेल्‍या बस चालकांना बाहेरील वातावरण शांत होईलपर्यंत वाहतूक थांबविण्‍याचे व्‍यवस्‍थापकांनी सांगितले. बार्शी आगाराच्‍या 248 फे-या रद्द करण्‍यात आल्‍याने महामंडळाचे एका दिवसाचे सुमारे दहा लाखांचे नुकसानप झाल्‍याचे वाहतूक निरीक्षक व्‍ही.टी. हांडे यांनी सांगितले.
    फेसबुकवर ज्‍या व्‍यक्‍तीने हा प्रकार केला आहे त्‍यावर ताबडतोब गुन्‍हा दाखल करण्‍यात यावा, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्‍यांनी केली. पोलीस उप‍अधिक्षक रोहिदास पवार, पोलीस निरीक्षक सालार चाऊस यांची भेट घेऊन कार्यकर्त्‍यांनी निषेध नोंदवला. यावेळी शांतता राखण्‍याचे आवाहन पोलिसांच्‍यावतीने करण्‍यात आले.

 
Top