बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- शुक्रवार रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले दुमजली घराचे माळवद कोसळून एका महिलेच मृत्यू झाला, तिचा पती गंभीर जखमी असल्याने सोलापूर येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले असून आणखी एक महिला गंभीर जखमी तर दुसर्‍या एका अपघातात एक युवक किरकोळ जखमी झाला आहे. मागील चोवीस तासात ६४ मिलीमीटर पावसाची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे.
    शहरातील ङ्कल्लाप्पा धनशेट्टी रोडवरील राऊळ गल्लीतील जुनी दुमजली इमारतीचे माळवद कोसळून झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. जखमीवर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पूनम प्रणीण पवार (वय ३२) असे मयत झालेल्या महिलेचे नाव असून वंदना रवी कापसे (वय ३५) व प्रवीण कमलाकर पवार (वय ३५) असे गंभीर जखमीचे नावे आहेत. आज सकाळी प्रवीण पवार यांना पुढील उपचारासाठी सोलापूरच्या सिव्हील रूग्णालयात हलविण्यात आले असून पवार यांची परिस्थिती चिंताजनक आहे. शहरातील ऐनापूर मारूती रोडवरील बापू तोडकरी या तरूण जखमी झाला. वार्‍याने पत्रा उडून तोडकरी याचा हातावर जखम झाली.
    शहरातील डिजीटल फलक व मोठे वृक्ष मुळासह उन्‍मळून पडले तर वीजेचे खांब, विजेच्या तारा तुटल्याने विज पुरवठा खंडीत झाला. वृक्ष तुटून ऐन रस्त्यावर पडल्याने वाहतुकीही खोळंबली. शुक्रवारी वादळी वार्‍यामुळे शहरातील बार्शी-कुडरुवाडी रोडवरील ढळे मळ्यानजीकचे सार्वजनिक बांधकाम खाते उपविभाग बार्शीचे जुने व मोठे लिंबाचे एक व चिंचेचे एक झाड मुळासह रस्त्यावर उन्‍मळून पडल्याने शुक्रवारी रात्री दहा पासून आज सकाळी अकरा वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. हा मार्ग बंद झाल्याने भोगेश्‍वरी चाळ परिसर, तसेच भीम नगर या अंतर्गत रस्त्यावरून एस.टी.बसेसेची वाहतुक वळविण्यात आल्याने शहरात वाहतुकीवर ताण पडला. शनिवार बाजार दिवस आल्याने शहरातील विविध भागातील वाहतुकीचे मार्गवार वाहतुकीचा खोळंबा झाल्याने वाहतुक पूर्णपणे कोलमडली होती. शहरातील देवणे गल्ली, बार्शी न्यायालय परिसर, भवानी पेठेतील पोस्ट ऑफिस, बस स्थानकातील आगार परिसर, टिळक चौकातील महात्‍मा गांधी उद्यान, बार्शी कुर्डूवाडी रोड परिसरातील मोठे व वाहतुकीला अडथळे निर्माण करणारे तुटून पडलेले झाडे हटविण्यासाठी बार्शी नगपरिषद प्रशासनाने पुढाकार घेत जेसीपी मशीन व कटरच्या साहय्याने झाडे हटवून वाहतुक सुरळीत केली. शहरातील सुभाषनगर परिसरातील ताडसौंदणे रस्त्यावरील पंडीत जवाहरलाल नेहरू नगपरिषद शाळा क्रमांक चौदाच्या सहा वर्ग खोल्यासह कार्यालय व व्हारड्यांतील सर्व पत्रे वार्‍यात उडून गेले आहेत. लहुजी वस्ताद चौकातील श्रीमती शकुंतला गणाचारी या शुक्रवारी रात्री घरात स्वयंपाक करताना वार्‍यासह झालेल्या पावसात घरावली पत्रे उडून घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले, या अपघातातून त्या थोडक्यात बचावल्या. तर याच भागात राहणारे पवार यांच्या म्हशीचे शिंग वार्‍याने उडून आलेल्या पत्रावरील दडाने मोडून म्हैश जखमी झाली.
    यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते नागेश अक्कलकोटे, प्रभारी मुख्याधिकारी श्रीकांत मायकलवार, उपमुख्याधिकारी म्हेत्रे, प्रशासनाधिकारी शरद कुलकर्णी, नागजी लामतुरे व कर्मचारी यांनी शहरातील रात्री पासून दुघर्टनाग्रस्त भागांचा पाहणी दौरा करत नगरपरिषदेच्या माध्यमातून मदत पुरवली.
    शहरातील विविध भागातील विज पुरवठा करणार्‍या तारा व विजेचे खांब वार्‍यामुळे तुटून पडल्याने शुक्रवारी रात्री पासून शहर व परिसरातील वीज पुरवठा पूर्णपणे बंद पडला आहे. नागरीकांनी शुक्रवारची रात्र वीज पुरवठा नसल्याने अक्षरशः जागून काढली. तुटलेल्या तारा, वाकलेले धोकादायक पोल हटविण्याचे काम विज वितरण कंपनीच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. दरम्यान या वादळी वार्‍याचा तडाखा पक्ष्यांनाही मोठ्या प्रमाणावर बसला. शहरातील लहुजी वस्ताद चौकात वादळी पावसाच्या तडाख्यात मोठ्या प्रमाणावर पोपटं व इतर पक्षी मृत्यू पावले. एकूणच शुक्रवारीच्या वादळी वार्‍यासह झालेल्या पावसात शहरातील विविध घरावरील पत्रे उडून गेले तर पत्रा शेडचे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारती उतरवून घेण्याची कार्यवाही करावी तसेच धोकादायक स्थितीतील झाडे त्वरीत काढून टाकावीत अशी मागणी नागरीक करत आहेत.

पालकमंत्र्याचे पंचनाम्याचे आदेश :
    दरम्यान पालकमंत्री दिलीप सोपल यांनी बार्शी व परिसरात शुक्रवार रोजी रात्री झालेल्या वादळी वार्‍याच्या पावसात झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाला दिले आहेत.
 
Top