उस्मानाबाद -: आर्थिक विकासासाठी शेतक-यांना गटशेती हा चांगला पर्याय आहे. त्यामुळे खर्चात बचत करणा-या आणि तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पन्न वाढण्यासाठी गटशेतीकडे शेतक-यांनी वळावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.
    जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी गुरुवारी सारोळा (ता. उस्मानाबाद) येथील व्हीआरडी एग्रो प्रोड्यूसर कंपनीच्या गटशेतीला भेट देऊन पाहणी केली. तसेच तेथे आयोजित ग्राम बीजोत्पादन प्रशिक्षण आणि सोयाबीन बियाणे वाटप कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी स्थानिक ग्रामस्थांशीही संवाद साधला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्माचे संचालक व्ही.डी. लोखंडे, कृषी उपसंचालक मदनलाल मिणीयार, बीजप्रमाणीकरण अधिकारी एम. के. आसलकर,  तालुका कृषी अधिकारी डी. आर. जाधव, मंडळ कृषी अधिकारी श्री. चिक्षे,  एग्रो कंपनीचे जाधव आदींची यावेळी उपस्थिती होती.
    डॉ. नारनवरे यांनी सारोळा येथील पॉलीहाऊस आणि गटशेतीचीही पाहणी केली. त्यानंतर ते म्हणाले की, शेतकऱ्यांनी अधिकाधिक गट स्थापन केले पाहिजेत. एकत्रितरित्या शेती केल्याने खते, बियाणे, कीटकनाशके हे कमी दरात मिळू शकतात. त्याचा लाभ शेतकऱ्यांना होऊ शकतो.  तंत्रज्ञानाचा वापर केल्याने मजूरीसाठी लागणारी आर्थिक तरतूद, वेळ याचीही बचत होते. यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेती  केल्यास मजूरांची अनुपलब्धता या समस्येला तोंड देणे शक्य असल्याचे ते म्हणाले.
    शेती हा व्यवसाय अधिकाधिक फायदेशीर कसा होईल, याकडे शेतक-यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. सध्या जिल्हास्तरावर आत्माअंतर्गत सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांची माहिती संकलित केली जात आहे. त्यामुळे शेतक-यांची गावनिहाय माहिती उपलब्ध होऊन विविध योजनांचा लाभ थेटपणे शेतक-यांना देणे सोपे होणार आहे. सारोळा गावाने गटशेतीसाठी पुढाकार घेतला ही कौतुकास्पद गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
    जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र यावर्षी वाढणार असल्याने घरगुती सोयाबीन बियाण्यांची उगवणक्षमता तपासून त्याचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभाग करीत आहे. त्यास प्रतिसाद देण्याचे आवाहन त्यांनी केले.
    प्रास्ताविक अमोल रणदिवे यांनी केले तर सूत्रसंचलन महादेव साठे यांनी केले. सारोळा येथे पूर्ण ग्राम बीज उत्पादन कार्यक्रम 603 एकरावर राबविण्यात आला. गावातील 180 शेतक-यांनी या ग्राम बीज उत्पादन कार्यक्रमात सहभाग घेतला.
 
Top