उस्मानाबाद -: ढोकी (ता. उस्मानाबाद) येथील कृषि चिकित्सालयात कोरडवाहू शेती अभियान 2014-15 कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत  उस्मानाबाद तालुक्यातील 24 शेतकऱ्यांना बी बी एफ पेरणी यंत्राचे वाटप आमदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.  
         याप्रसंगी तालुका कृषि अधिकारी डी. आर. जाधव, मंडळ कृषि अधिकारी ए. पी. चिक्षे, कृषि पर्यवेक्षक बी. व्ही. पाटील, के. जी. सुरवसे, टी. जी. हिप्परकर, व्ही. आर. गायकवाड व येडशी आणि तेर मंडळातील सर्व कृषि सहायक उपस्थित होते.
    कृषि विभागाने अल्प /अत्यल्प, मागासवर्गीय व महिला शेतक-यांना व बहुभूधारक शेतक-यांना अल्पदरात यंत्र मंजूर केल्याने निश्चितच शेतक-यांच्या शेती उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास यावेळी आमदार निंबाळकर यांनी व्यक्त केला. कोरडवाहू शेती अभियान अंतर्गत बीबीएफ यंत्र अनुदान तत्वावर वाटपाचा कार्यक्रम हा शेतक-यांसाठी अतिशय उपयुक्त असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
      या पेरणी यंत्रामुळे रुंद सरी वरंब्यावर पेरणी करता येईल. प्रत्येक वरंब्यावर सरी पडल्याने सरित पावसाचे पाणी मुरुन जलसंधारण होते. जास्त पाऊस झाल्यास पाण्याचा निचरा होवून पिकाचे 20 टक्के अधिक उत्पादन होण्यास मदत होईल, असे यावेळी कृषी अधिकारी यांनी सांगितले.
    प्रास्ताविकात तालुका कृषि अधिकारी जाधव यांनी कोरडवाहू अभियान योजनेचे महत्व विशद केले. या पेरणी यंत्राची किंमत 48 हजार 348 असून अल्प, अत्यल्प, भूधारक शेतकरी, मागासवर्गीय व महिला शेतक-यांना 4 हजार 348 रुपयाला प्रतिनग तर बहुभूधारक शेतक-यांना  यंत्र 13 हजार 348 प्रति नग या प्रमाणे वाटप करण्यात येत  असल्याचे त्यांनी सांगितले.
 
Top