बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची जाहीरसभा होत आहे. दि.१९ जुलै रोजी बार्शीतील भगवंत मैदान येथे या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
      सभेचे नियोजन तसेच नवीन मतदारांची नोंद करण्यासाठी, वॉर्ड, प्रभागानुसार मतदारांची माहिती संकलन करण्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी बैठक घेतली. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती केशव घोगरे, बाबासाहेब कापसे, आण्णा शिंदे, रावसाहेब मनगिरे, राजश्री डमरे, नगरसेवक दिपक राऊत, महेदिमियॉं लांडगे, आण्णा बोकेफोडे आदी उपस्थित होते.
    यावेळी बोलतांना राऊत म्हणाले, मागील पाच वर्षांत आपल्याकडे कोणतीही सत्ता नसतांनाही जनतेच्या अनेक अडचणी प्रामाणिकपणे सोडविण्याल्या. कार्यकर्त्यांनीही आपल्याकडे सत्ता नसल्याची उणीव भासू दिली नाही एकाही कार्यकर्त्यांने विरोधकांशी हातमिळवणी केली नाही यावरुनच जनतेचे प्रेम व विश्वास दिसून येत आहे. निवडणुकांचे कोणत्याही प्रकारचे वातावरण नाही तरीही पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेबांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दि गोळा होईल. विधानसभेचे रणांगण तयार असून निवडुकीच्या रणसंग्रामात लढाईसाठी आपण सज्ज असल्याचे सांगत यावेळी कोणत्याही प्रकारच्या चुका होऊ देणार नाही, शिवसेनेतील आपला प्रवेश झाला त्यादिवशीच विरोधक पंक्चर झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत चांगले नियोजन केल्यामुळेच त्यांना यश मिळत गेले त्यांचा आदर्श व त्यांचे विचार घेऊन आपण वाटचाल करत आहोत. दूध उत्पादकांसाठी आपण दूध संघ सुरु केला, शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी आपण खाजगी तत्वावरील कृषि उत्पन्न बाजार समिती उभी केली त्याचे कामही जवळजवळ पूर्ण झाले असून पंधरा दिवसांत तेही पूर्ण होईल. त्यापुढे लिंबू प्रक्रिया उद्योग, चांगले हॉस्पिटल उभारणार आहोत.
    येणा-या काळात अनेक प्रकारचे नियोजन करायचे असल्याने जनतेने दुपारी एकच्या नंतर शक्यतो फोन करु नये. पोलिस स्टेशन उवा दवाखान्यातील अत्यंत आवश्यक काम असल्यास आपण कोणत्याही वेळी फोन घेऊ. येणार्‍या काळात नंबर वन बार्शी तालुका बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.
 
Top