तुळजापूर -: आई तुळजाभवानीच्या आशिर्वादामुळेच आपल्याला मंत्रीपद मिळाले असुन आपण तुळजापूर-सोलापूर रेल्वेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू व लवकरात लवकर रेल्वेमार्ग होण्यासाठी पाठपुरावा करू तसेच तुळजापूरचा केंद्रीय पर्यटनस्थळात समावेश करू असे मत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सत्कार प्रसंगी व्यक्त केले.
    शनिवार दि. २६ रोजी केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी तुळजापूरला भेट देऊन श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यानंतर रेल्वे संघर्ष समितीच्यावतीने नाईक यघांचा तुळजाभवानी मंगल कार्यालयात भव्य सत्कार करण्यात आला. संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश कोळी, नगराध्यक्षा सौ. जयश्री कंदले, नागेश नाईक, किशोर गंगणे, सुधिर कदम यांनी तुळजाभवानी मातेची प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला.
    यावेळी रेल्वे संघर्ष समितीचे बबन गावडे, अ‍ॅड. किशोर कुलकर्णी, गणेश जळके, इंद्रजित साळुंके, विकास मलबा आदि उपस्थित होते. प्रारंभी नगराध्यक्षा जयश्री कंदले यांनी ना. नाईक यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश कोळी यांनी तर सुत्रसंचलन गणेश जळके यांनी केले. या कार्यक्रमास भाजपाचे विजय शिंगाडे, बाळा शामराज, सुहास साळुंके, उमेश गवते, शिवाजी डावकरे, नगरसेविका स्मिता लोंढे, पुजारी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व भाजपा, शिवसेना, रिपाईचे कार्यकर्ते उपस्थित होते.
    दरम्यान, याच कार्यक्रमात पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे यांनी नळदुर्ग येथील खंडोबा मंदिराच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र विकास व पर्यटन योजनेतून सभागृह स्वच्छतेसह अन्य सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
 
Top