केज : दोन चिमुकल्‍यांचा पाण्‍यात बुडून मृत्‍यू झाल्‍याची घटना गुरुवारी सकाळी साडेनऊच्‍या सुमारास बोबडेवाडी (ता. केज) येथे घडली. याप्रकरणी केज पोलीस ठाण्‍यात आकस्मित मृत्‍यूची नोंद करण्‍यात आली आहे.
        वर्षा संदीपान काळे (वय 8 वर्षे) व शरद संदीपान काळे (वय 5 वर्षे) (दोघे रा. बोबडेवाडी, ता. केज) असे पाण्‍यात बुडुन मृत्‍यू झालेल्‍या बहीण-भावाचे नाव आहेत. यातील वर्षा आणि तिचा लहान भाऊ हे दोघे गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास घरून शाळेत जाण्यासाठी निघाले होते. त्यानंतर अंगणवाडीच्या शाळेत आपले दप्तर ठेऊन ते एक कि.मी. अंतरावर असलेल्या नदीच्या पात्रात खेळण्यासाठी गेले. तेथील एका खड्ड्यात दोघेही पडून मृत्यू पावल्याची खबर ११ वाजता त्यांच्या नातेवाईकांना कळाली.
    त्यानंतर लगेचच त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी दोघेही मृत झाल्याचे आढळून आले. हे पाहून तेथे एकच आक्रोश झाला. दरम्यान, या प्रकरणी मृत्यू पावलेल्या बालकांचे चुलते कमलाकर साहेबराव काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून केज पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 
Top