नळदुर्ग :-   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या कल्‍पनेतील शंभर स्‍मार्ट शहरे या संकल्‍पनेत नळदुर्ग शहराचा समावेश करुन ऐतिहासिक नळदुर्ग किल्‍ल्‍यात पर्यटन सुधारणा करण्‍याची मागणी नळदुर्ग शहर भाजपावतीने केंद्रीय सांस्‍कृतीक व पर्यटन मंत्री ना. श्रीपाद यांनी यांच्‍याकडे निवेदनाद्वारे करण्‍यात आली आहे.
    शनिवारी केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी नळदुर्ग शहराला भेट दिली. यावेळी त्‍यांचा नळदुर्ग शहर भाजपाच्‍यावतीने सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी ना. श्रीपाद नाईक यांना नळदुर्ग शहराचा शंभर स्‍मार्ट शहरामध्‍ये समावेश करण्‍याबाबतचे निवेदन देण्‍यात आले. या निवेदनात म्‍हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात शंभर स्‍मार्ट शहरे करण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍या अनुषंगाने त्‍यांनी कार्य ही हाती घेतली आहे. नळदुर्ग हे उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील ऐतिहासिक शहर आहे. चौदाव्‍या शतकातील चालुक्‍य वंशाचा राजा नळ यांची नळदुर्ग ही राजधानी होती. नळदुर्ग येथे 120 हेक्‍टर क्षेत्रावर ऐतिहासिक किल्‍ला वसलेला आहे. किल्‍ल्‍याच्‍या चौहीबाजूने नदीचे पात्र फिरवून किल्‍ल्‍याच्‍या आत नर-मादी धबधबा आहे. हा धबधबा पावसाळ्यात ओसंडून वाहत असतो. दीडशे फुट उंचावरुन पडतानाचे दृश्‍य विहंगम असते. हे दृश्‍य पाहण्‍यासाठी राज्‍यासह कर्नाटक व आंध्रप्रदेशातून लाखो भाविक नळदुर्गात येता. त्‍यामुळे नळदुर्ग शहरास स्‍मार्ट शहर बनवून पुढील सुविधा पुरविण्‍याची मागणी करण्‍यात आली आहे. नळदुर्ग किल्‍ल्‍यातील व किल्‍ला बाहेरील ऐतिहासिक क्षेत्र परिसरातील अतिक्रमण त्‍वरीत काढावे, येथे पार्कींगची व्‍यवस्‍था करावी, बोरी नदीचे पाणी साठा करुन सतत धबधबा सुरु कसा करता येईल त्‍या दृष्‍टीने प्रयत्‍न व्‍हावा, धबधब्‍यातून पडणा-या पाण्‍यापासुन वीज निर्मिती करता येते का? ते तज्ञामार्फत पहावे व त्‍यास चालना द्यावी, किल्‍ल्‍याच्‍या परिसरात पंचतारांकित हॉटेल्‍स उभारुन पर्यटकांची भोजन व्‍यवस्‍था करावी, बोदी नदीच्‍या पात्रात बोटींग व्‍यवस्‍था करावी, पाणी संग्रहालय व सुंदर बागेची निर्मिती करावी, या शहराची नगर रचना विभागामार्फत सिटी सर्व्‍हे करुन शहराचा सुधारित आराखडा तयार करावा, नळदुर्ग शहरास तालुक्‍याचा दर्जा देऊन पर्यटकांना आकर्षित करण्‍याबाबत राज्‍य शासनास आदेशित करावे, येथील रामतीर्थ देवस्‍थान क्षेत्राचा विकास करावा, नळदुर्ग येथील श्री खंडोबा तीर्थ क्षेत्राचा पर्यटन क्षेत्रात समावेश करुन विकास करावा, आदी मागणी ना. श्रीपाद नाईक यांच्‍या निवेदनाद्वारे करण्‍यात आली आहे. या निवेदनावर भाजपा मिडीया सेलचे जिल्‍हाध्‍यक्ष सुशांत भूमकर, भाजपाचे शहराध्‍यक्ष पद्माकर घोडे, तालुका सदस्‍य धिमाजी घुगे, गोपाळ देशपांडे, सचिन घोडके आदींच्‍या स्‍वाक्ष-या आहेत. यावेळी श्रीपाद नाईक यांनी म्‍हटले की, अशा प्रकारची मागणी ही संपूर्ण महाराष्‍ट्रातून सर्व प्रथम नळदुर्ग शहराच्‍यावतीने करण्‍यात आली आहे असे सांगून त्‍यांनी नळदुर्ग शहराचा विकास करण्‍याचा प्रयत्‍न करु, असे आश्‍वासन दिले.
 
Top