उस्मानाबाद -: एचआयव्ही संसर्गीत मातेकडून जन्माला येणा-या बाळाची तपासणी एआरटी सेंटरमार्फत करणे आवश्यक आहे. मात्र, अशावेळी आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेणे शक्य होत नसेल तर त्यांच्यासाठी जिल्हा एडस नियंत्रण विभागाने स्व-निधी  उभारुन अशा रुग्णांना मदत करण्याचे ठरविले आहे. याशिवाय, संबंधित रुग्णांच्या मदतीसाठी जिल्हा नियोजन समिती आणि आरोग्य विभागाकडेही याबाबतचा प्रस्ताव पाठवा, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांनी दिल्या.
       जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण समितीची आज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जयपाल चव्हाण, राष्ट्रीय एडस नियंत्रण कार्यक्रमाचे नोडल ऑफीसर डॉ. एम. व्ही. बाबरे, एनआरएचएमचे कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. एन. के. गाडेकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. गोमसाळे,  एडस प्रतिबंध व नियंत्रण समितीचे कार्यक्रम व्यवस्थापक गणेश काकडे, स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकरी आर. बी. जोशी, एनआरएचएमचे मूल्यमापन व सनियंत्रण अधिकारी श्री. तांदळे, जिल्हा पर्यवेक्षक महादेव शिनगारे आदी उपस्थित होते.
      यावेळी जिल्ह्यातील एचआयव्ही एडस नियंत्रण कार्यक्रमाचा तिमाही आढावा श्री. पाटील यांनी घेतला. मागील बैठकीवेळी ठरविण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या उद्दिष्ट्यपूर्तीचा अहवाल यावेळी श्री. काकडे यांनी सादर केला. जिल्ह्यामधील ट्रक ड्रायव्हर, कला केंद्रांमध्ये असणाऱ्या महिला, देहविक्री करणाऱ्या महिला यांच्यासाठी या कालावधीत हेल्थ कॅम्प आयोजित करण्यात आले होते. यात पार्डी फाटा (वाशी) आणि चौरस्ता (उमरगा), नळदुर्ग रोड येथे ट्रक ड्रायव्हरांसाठी तपासणी शिबीर घेण्यात आले.  तसेच कलिका कला केंद्र चोराखळी, साई व पिंजरा कलाकेंद्र येथील महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. याशिवाय, उस्मानाबाद येथे राजस्व अभियान राबविण्यात आले. यात एचआयव्ही संसर्गीत व्यक्ती, तृतीय पंथी, विधवा महिला, देह विक्रय करणाऱ्या महिला अशा 250 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.              
 
Top