पांगरी (गणेश गोडसे) :- सोलापुर-उस्मानाबाद जिल्हयाच्या सरहद्दीवर येडशी पासुन तीन किलोमीटर अंतरावर बालाघाटाच्या पर्वतरांगा व दंडकारण्यात निसर्गाच्या कुशीत वसलेले असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान व तिर्थक्षेत्र म्हणून घोषित केलेले श्रीक्षेत्र रामलिंग म्हणजे भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरत आहे. सध्या रामलिंग या तिर्थक्षेत्राच्या जिर्नोध्‍दाराचे काम सुरू आहे.
    मायावी हरिणाला पकडण्यासाठी गेलेल्या प्रभु रामचंद्राच्या अनुपस्थितीचा फायदा घेउन सीतेचे अपहरण करून पळालेल्या रावणाचा पाठलाग करून सीतेला सोडवण्याचा प्रयत्न करणा-या जटायु पक्षाचे आणि रावणाचे युध्द या प्रसिध्द अशा रामलिंग या ठिकाणीच झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. युध्दानंतर या ठिकाणी प्रभु रामचंद्रांचे आगमन झाल्यानंतर जखमी अवस्थेतील जटायु पक्षाला पाणी पाजण्यासाठी व शिव शंकराची आराधना करण्यासाठी प्रभु रामचंद्रानी आपल्या जवळील बाणाने पाणी काढले, ते पाणी जटायु पक्षाला पाजले.  तसेच तेथेच त्‍यांनी स्वतः लिंगाची स्थापना करून शिव आराधना केली. पुजेसाठी बान मारून पाणी ऊपलब्ध केले. ते ठिकान आज गायमुख म्हणुन सुपरिचित आहे.
    रामलिंग हे द्रोणाच्या आकाराचे मंदिर असुन हेमाडपंथी वास्तुशिल्पाचा आणि दगडी कामाचा अप्रतिम असा अविस्कार आहे. चोहोबाजुंनी डोंगरांनी वेढलेल्या मंदिराचा परिसर अतिशय रमणीय असुन श्रावणात येथे सर्वत्र हिरवळ असते. यावेळी या परिसराची शोभा अवर्णणीय असीच असते. मंदिराच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवल्याशिवाय मंदिर दिसतच नाही. २५० पायरी उतरूनच मंदिरात प्रवेश करावा लागतो. मंदिर प्रवेशासाठी पुर्व, पश्‍चिम व उत्तरेला असे तीन दरवाजे असुन पुर्वेला गोमुख आहे. तेथे अखंड पाण्याचा झरा वाहत असतो. तो कधीच आटत नाही असे येथील पुजारी यांनी तुळजापूर लाईव्‍हशी बोलताना सांगितले. मंदिराच्या पुर्वेला सुंदर असा धबधबा असल्यामुळे मंदिराच्या सौदर्यात आणखीनच भर पडते. मंदिराच्या चारी बाजुंना डोंगर, दाट जंगल पसरले असुन माकडे, वानरे, मोर, हरणे, ससे यासह अन्य वन्य प्राण्यांच्या अस्तित्वामुळे या परिसराला अभयारण्य म्हणुनही घोषित करण्यात आलेले आहे. चालु वर्षी वरुणराजाने या भागात वेळेवरच हजेरी लावल्यामुळे रामलिंग मंदिराच्या परिसरातील डोगरांनी हिरवी चादर पांघरलेली आहे असे दृष्य पहावयास मिळत आहे. त्यामुळे येथिल परिसराचे सौदर्य मनमोहक व आकर्षक वाटत आहे. येणा-या भाविकांच्या व पर्यटकांच्या मनात घर करत आहे. येथील मंदिरात अखंड धुनी तेवत असते.
    प्रत्येक वर्षी श्रावण महिन्‍यात आणि चंपाष्ठमीला येथे मोठी यात्रा भरते. सोलापुर, लातुर, उस्मानाबाद, बीड, परभणी, देड, अंबेजोगाई,  पुणे आदी जिल्हयांसह महाराष्ट्रामधुन विद्यार्थी सहलींसाठी तर भाविक या जागृत देवस्थानाच्या दर्शनासाठी येत असतात. रामलिंगला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला असुन सध्या येथे विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंदिराला उत्पन्नाचे कोणतेच साधन नसुन मंदिराचा सर्व खर्च भाविकांच्या दानामधुनच भागवला जातो. तिर्थक्षेत्र विकास मंडळांकडुन रामलिंगसाठी विकास निधी मंजुर असुन त्यापैकी कांही अंशी ऊपलब्ध निधीतुन सध्या येथील विकास कामे सुरू आहेत. ४०० ते ५०० वाव-या कमकुवत असल्यामुळे त्या काढुन तेथे भक्तनिवास बांधण्‍याचा तेथील कारभारी मंडळींचा संकल्प आहे. या मंदिरात सन १९४० ते ५० च्या दरम्यान म्हैसुरकर स्वामी होऊन गेले होते. त्या स्वामी महाराजांचे ध्यान धारणा करण्‍याचे तळघर आजच्या काळातही सुस्थितीत असल्याचे पहावयास मिळत आहे. स्वामी करपात्री महाराज, स्वामी शंकराचार्य आदी महती या श्रध्‍दास्थानी येऊन गेल्याचा इतिहास आहे. उत्रेश्‍वर पिंपरीचे कै.ज्ञानेश्‍वर माऊली महाराजांचे रामलिंग हे अतिशय आवडते स्थळ होते.
    ‘वेदश्री” या शब्दाचा अपभ्रंस होऊन ‘येडशी ‘हे नांव तयार झाले असुन संतभुमी म्हणुन ओळखल्या जाणा-या प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तसेच जटायुच्या बलिदानाने पवित्र झालेल्या श्रीक्षेत्र रामलिंगला भाविकांच्या मनात अढळस्थान आहे. आर्य समाजाचे गुरूकुल वैदिक संस्कृत महाविद्यालय या परिसरातच निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे. शंभर वर्षांपुर्वी ब्रिटीशांनी बांधलेले दुर्गादेवी हिलस्टेशन सध्या नव्या दिमाखात उभे आहे. रामलिंग हे येथील रमणीय व मनमोहक वातावरणामुळे ‘मिनी महाबळेश्‍वर म्हणुनही ओळखले जात आहे.
 
Top