नळदुर्ग -: शिक्षणातून विकास हा परिवर्तनाच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. त्यामुळे चारित्र्य निर्मिती करणारे शिक्षण देणे ही गरज असून त्याबरोबरच कौशल्य विकास महत्वाचा असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी केले.
    नळदुर्ग येथील डॉ.आंबेडकर इन्टरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलच्या नवीन इमारतीचे उदघाटन रत्‍नाकर गायकवाड यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, शिवसेनेचे माजी जि.प.  सदस्‍य गणेश सोनटक्‍के, नळदुर्गच्या उपनगराध्यक्षा अपर्णा बेडगे, डॉ.भगवान गवई, अभिजित चव्हाण, मारुती खारवे, निर्मला गायकवाड आदिंची यावेळी उपस्थिती होती.
    यावेळी गायकवाड, डॉ.नारनवरे आणि मान्यवरांच्या हस्ते शाळा परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.
    गायकवाड म्हणाले की, ही  शाळा ग्रामीण विकासाचे केंद्र व्हावे, शिक्षणातून विकास आवश्यक आहे. त्यासाठी मन आणि बुध्दीचा विकास करणारे आणि आधुनिक काळात कौशल्याधारित शिक्षण आवश्यक आहे. त्याद्ष्टीने शाळेने पाऊले उचलावीत. यासाठी पालक, शिक्षक आणि समाजाचाही सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
    जिल्ह्याचा नावलौकीक  वाढविणारी ही शाळा ठरेल, असे डॉ. नारनवरे यांनी नमूद केले. श्रीमती रावत यांनी ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाची शाळा ही या पिढीला भविष्य कालीन आव्हानासाठी  मार्गदर्शक ठरेल,असे सांगितले.
   गवई यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. शालेय विद्यार्थ्यांनी सुरुवातीला स्वागत गीत सादर केले.
    यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार काशीनाथ पाटील, गटविकास अधिकारी खिल्लारे यांच्यासह परिसरातील मान्यवर उपस्थित होते.        
 
Top