वैराग (महेश पन्‍हाळे) : बार्शी तालुक्‍यात मृग नक्षत्राच्‍या झालेल्‍या जोरदार पावसामुळे नागझरी व भोगावती नद्याचे पात्र भरून ओसंडून वाहू लागल्‍या आहेत.
    नद्यांना आलेल्‍या पाण्‍यामुळे शनिवारी दि. 30 ऑगस्‍ट रोजी बाळेरास (ता.बार्शी) येथील नागझरी नदीवरील पुलावरून वाहणा-या पाण्‍यामुळे बार्शी ते सोलापूर या मार्गावरील वाहतूक सात तास ठप्‍प झाली होती. अचानक आलेल्‍या या पाण्‍यामुळे नद्या काठच्‍या हत्‍तीज राळेरास, धामणगाव (दु), सासुरे, दहिटणे, मुंगशी (वा) आदी गावातील शेतकरी, जनावरे शेतात अडकून पडले होते. नदीकाठच्‍या शेतातील पिके, शेती औजारे नद्यामधील पाण्‍यात वाहून गेले आहेत. रूई (ता.बार्शी)  येथील एक पाझर तलाव फुटल्‍याने अनेक शेतक-यांची जमीन, माती व कांद्याचे पिकही वाहून गेली आहेत. गेली अनेक महिने वाट पाहवी लागणा-या पावसामुळे नुकसान का होईना? मात्र अणखी दमदार पाऊस पडायला हवा अशी विनवणी बळीराजाकडून केली जात आहे.
    दरम्‍यान गेली कित्‍येक वर्षे कोरडी असलेल्‍या नागझरी नदी वाहू लागल्‍याने राळेरास सरपंच सुरेश पंके, बार्शी तालुका कॉंग्रेस अध्‍यक्ष सुधीर गाढवे, मोहन पाटील आदींनी नदीचे जलपूजन करुन श्रीफळ अर्पण केला. हिंगणी, हत्‍तीज, जळगाव, राळेरात, शेळगाव मुंगशी ते शेरेवाडी, भागाईवाडी कौठाळी (ता. उत्‍तर सोलापूर) या गावचा संपर्क नदीस आलेल्‍या पाण्‍यामुळे तुटला आहे. सायंकाळी पाचनंतर नदीच्‍या पाण्‍याचा प्रवाह कमी झाल्‍याचे धनाजी मल्‍लीकार्जून क्षीरसागर यांनी सांगितले. तर पाहटे सव्‍वाचार नंतरच्‍या एस.टी बसेस राळेरात येथे अडकून पडल्‍याने प्रवाशी व वाहनधारकांची मोठी पंचायत झाली होती.
 
Top