उस्मानाबाद :-  उस्मानाबाद तालुका संपूर्णपणे निर्मल व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. नागरिकांना त्यासंदर्भात जागृत करण्याचे काम हे ग्रामपातळीवर काम करणाऱ्या सरकारी यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आहे. त्यामुळे या सर्वांनी जिल्हा हागणदारीमुक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत आणि घर तेथे शौचालय असलेच पाहिजे, यादृष्टीने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.
        येथील जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्धाटन डॉ. नारनवरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्री तांबे, जिल्हापरिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता कक्षाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दुबाकले, उपमुख्यकार्यकारी अधिकारी (पंचायत) श्री. माने, विविध तालुक्यातील तहसीलदार व गटविकास अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.
          यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी गेल्या काही महिन्यांपासून विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन  काम करीत असल्याचे सांगितले. मात्र, त्याचबरोबर उत्तम आरोग्यासाठी आणि स्वच्छ परिसरासाठी प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. जिल्ह्यात केवळ 30 टक्के नागरिकांकडे वैयक्तिक शौचालये आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीनेही घर तेथे शौचालय ही संकल्पना प्रत्यक्षात येणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
            आपला जिल्हा निर्मल जिल्हा होण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आणि प्रत्येक कुटुंबाने पुढाकार घेतला पाहिजे.  त्यामुळेच यापुढे निवेदने घेऊन जिल्हा मुख्यालयात येणाऱ्या विविध संघटना, मित्रमंडळे आणि नागरिकांकडे वैयक्तिक शौचालये आहेत का, त्यांनी आपापल्या गावात वृक्षलागवड केली आहे का, याचीही माहिती घेतली जाणार आहे.    तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील या ग्रामस्तरावरील कर्मचाऱ्यांनी अधिक जागरुकतेने याबाबत नागरिकांना आवाहन केले पाहिजे. शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर प्रत्येकाने कर्तव्यही बजावले पाहिजे. ग्रामस्तरावरील यंत्रणांनी अधिकाधिक गतीमान झाले पाहिजे, असे निर्देश त्यांनी दिले.
         वैयक्तिक शौचालय बांधकाम, परिसर स्वच्छता, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेसाठी वृक्षलागवड असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जी गावे या उपक्रमाकडे दुर्लक्ष करतील, त्यांच्याच विकासावर परिणाम होणार असल्याने ही गावे मागे राहतील. त्यामुळे सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. विविध योजनांची एकत्रित अंमलबजावणी गावात व्हावी, यासाठी गावानेच एकत्र येऊन विकास आराखडा तयार करावा, असे डॉ. नारनवरे यांनी नमूद केले.
    अपर जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी युवक-युवती मेळाव्यांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, महिला सबलीकरण, निर्मल ग्राम, पर्यावरणपूरक गाव निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले. तालुकावार असे मेळावे घेऊन युवक-युवतींना प्रोत्साहन देण्याचे काम अशा उपक्रमातून होत आहे. प्रत्येक गावांत मिळत असणारा प्रतिसाद पाहता गावांमध्ये सकारात्मक बदल होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.
     उपजिल्हाधिकारी श्री. तांबे यांनी रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक शौचालय घेण्यासाठी प्रेरित करण्याचे आवाहन ग्रामस्तरावरील यंत्रणांना केले. श्री. दुबाकले यांनी प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले. रमाकांतगायकवाड यांनी सूत्रसंचलन केले.
 
Top