बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर ) बार्शी शहरात शिवसेना, भाजपा, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष व इतरांमध्ये बहुरंगी लढत लागली आहे. शिवसेनेकडून राजेंद्र राऊत, भाजपाकडून राजेंद्र मिरगणे, कॉंग्रेसकडून सुधीर गाढवे, राष्ट्रवादीकडून दिलीप सोपल, अपक्ष व इतर अनेक उमेदवारांनी अर्ज भरले असून बहुरंगी लढतीमध्ये राजकिय वातावरण चांगलेच तापत आहे.
    अनेक वर्षांपासून राजकारणाचा व समाजकारणाचा अनुभव असल्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार राजेंद्र राऊत आणि पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री दिलीप सोपल यांच्या प्रचाराला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. दोघांनीही आगळगाव (ता.बार्शी) येथील ग्रामदैवत विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातून प्रचाराचा नारळ फोडून सुरुवात केली. दोन्ही प्रबळ उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र असतांना मिरगणे यांचे घोडे जागेवरच असल्याचे चित्र दिसून येत आहे.   
   
    अपक्ष फार्म भरलेल्या भाऊसाहेब आंधळकर यांनी मागील काही वर्षांच्या काळात पालकमंत्री दिलीप सोपल यांच्याशी असलेला घरोबा तोडून शिवसेनेत प्रवेश करुन वेगळी चूल मांडली. मधल्या काळात शिवसेनेकडे निर्माण झालेली पोकळी भरुन काढतांना अनेक शिवसैनिकांच्या कामकाजाच्या गरजा त्यांना पेलता आल्या नाहीत. त्यांनी त्यांच्या प्रत्येक कार्यात शिवसेनाप्रमुखांचे छायाचित्र, मनापासून शिवसेनेचे काम केले असून प्रचंड महत्वाकांक्षा असली तरी, निवडून येण्यासाठी असलेले कौशल्य, मनुष्यबळ, प्रचंड कामाची शिदोरी कमी पडल्याचे दिसून आले. शिवसेनेतून तिकीट मिळाले नाही तरी शिवसेना पक्षाचे काम करणार तसेच राजाभाऊ राऊत यांना उमेदवारी दिल्यावर प्रचार करणार असल्याचे अनेक जाहीर सभेतून केलेल्या वक्तव्यानंतर तिकीट कट झाल्यावर मात्र त्यांनी अपक्ष फॉर्म भरुन नाराजीचा सूर आवळला आहे. कॉंग्रेस पक्षातून फॉर्म भरलेल्या सुधीर गाढवे यांना तर आपण या तालुक्यातील मतदार आहोत, आपण या गावचे रहिवासी आहोत इथपासून ओळख करुन देण्याची गरज आहे. कोणत्याही सामाजिक कार्यात नसलेल्या नवख्या उमेदवाराला कॉंग्रेस पक्षाने दिलेली उमेदवारीच कॉंग्रेस पक्षाची दयनीय अवस्था दाखवून देते. राजेंद्र राऊत यांनी अगदी तळागाळातील कार्यकर्ता बनून राजकिय कारकिर्दीस सुरुवात नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार आदी पदे भूषवून ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपरिषद आदींवर झेंडा रोवला. अनुभवी विरोधक व सर्व सत्तास्थाने त्यांच्याकडे असतांनाही शिवसेनाप्रमुखांच्या आशिर्वादाने कार्यकर्त्यांची फळी उभी करुन सोपलसारख्या तगड्या राजकारणीच्या विरोधात राजकिय मुहूर्तमेढ रोवली. निवडणुकांमध्ये सक्षमपणे विरोध करण्यासाठी दुध डेअरी, खडी क्रशर, पशुखाद्याचा व्यापार, मोटार वाहतूक, पतसंस्था, शुध्द पाणी बाटली आदी व्यवसाय उभे करुन, खाजगी मार्केट कमिटीची उभारणी केली. नगरपालिकेच्या सर्व व्यवहारांवर बारीक लक्ष ठेवत राजकिय विरोधकांना सतत जागेवर आणले. दिलीप सोपल यांची कारकिर्द युवक कॉंग्रेसमधून सुरु झाली. कॉंग्रेसची परंपरा व संपूर्ण महाराष्ट्रात चांगली ताकद असतांना शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रकारचे राजकिय डाव शिकून तयार झालेला पैलवान म्हणून दिलीप सोपल यांचे नाव झाले. विरोधत असलेल्या मातब्बर उमेदवारांना पराभूत करुन वेगवेगळ्या चिन्हावर निवडून येण्याचा इतिहास निर्माण करुन बार्शी तालुक्याला पहिल्यांदाच मंत्रीपदाचा बहुमान मिळवून दिला. उजनी जलाशयावरुन पिण्याचे पाणी आणून महत्वाकांक्षी योजना पूर्ण केल्यानंतर उजनीवरुन शेतीसाठी पाणी बार्शीच्या जवळ आले आहे. सदरच्या शेतीसाठीच्या योजनेच्या पूर्णत्वाकडे नेऊन संपूर्ण तालुक्याचे नंदनवन करण्याचा संकल्प केला आहे. शहरात अनेक प्रकल्पांना मंजूरी देऊन जवळपास १४०० कोटींची कामे सुरु केली आहेत. राजेंद्र मिरगणे यांनी आर.एस.एम. समाजसेवा संस्थेच्या माध्यमातून मागील दोन वर्षांपासून सामाजिक कार्य सुरु केले. नेत्र तपासणी, दुष्काळी भागात टँकरने मोफत पाणी पुरवठा, शेतकर्‍यांना बियाणे वाटप, पोलिस प्रशिक्षण, शेतकरी मार्गदर्शन, जलसंधारण, कच्चे रस्ते, महिला बचत गटांना मार्गदर्शन आदी सामाजिक कार्यातून राजकिय प्रवेश केला आहे. त्यांच्याकडे अद्याप कोणतीही सत्ता नाही. लोकसभेसाठी इच्छुक म्हणून पुढे आल्यानंतर शिवसेनेने तिकीट डावलले, त्यानंतर पुन्हा विधानसभेसाठी तयारी केली यावेळीही अनुभवी असलेल्या राऊत यांना तिकीट मिळाल्यानंतर अपक्ष उभे राहण्याच्या परिस्थितीत असलेल्या मिरगणे यांना महायुती तुटल्याचा फायदा होऊन भाजपाने उमेदवारी दिली. मागील अनेक वर्षांपासून बार्शी तालुक्यात विविध प्रकारचे राजकिय परिवर्तने झाली आहेत. विधानसभेच्या रिंगणात अनेक उमेदवार उभे असले तरी शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप सोपल यांच्यातच खरी लढत होत असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसत आहे.
 
Top