बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर ) बार्शी विधानसभा निवडणुकीच्या रणांगणावर चांगलीच रणधुमाळी सुरु झाली असून शिवसेनेच्या राजेंद्र राऊत यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्या दिलीप सोपल यांनी आगळगाव (ता.बार्शी) येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी सोपल यांनी राऊत यांच्या सभेला चोख उत्तर देऊन प्रचारात आघाडी घेतली.
    यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी भाऊराव लंगोटे गुरुजी, अब्बासभाई शेख, पोपट डमरे, जयंत बुरगुटे, विक्रम सावळे, नंदू पाटील, बंडू गरड, विजय बदाले, नंदू काशीद, रमाकांत माळी यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते.   
    याप्रसंगी बोलतांना पालकमंत्री दिलीप सोपल म्हणाले, १९८५ पासून आपण निवडणुका लढविल्या आहेत परंतु मागच्या सर्व निवडणुकांपेक्षा जास्त उत्साह आज कार्यकर्त्यांमध्ये आहे. आजपर्यंत आगळगाव येथे ज्या सभा झाल्या त्यापैकी रेकॉर्डब्रेक गर्दी यावेळी दिसून आली. त्यांचा उत्साह पाहून आनंद , प्रफुल्लीत होऊन माणसाने माणसावर किती प्रेम करावे यामुळे मन भरुन आले आहे, आपण आयुष्यात येऊन आणखी काय मिळवायचं असे म्हणत प्रचाराचा नारळ फोडून स्टेजवर आल्याबरोबर पालकमंत्री दिलीप सोपल यांनी कार्यकर्त्यांना दंडवत घाताला. विरोधकांना कोणतेही काम मीच केले म्हणायची सवय लागली आहे. आपण केलेल्या कामाचेही श्रेय घेण्यासाठी विरोधकांचा नेहमी आटापिटा सुरु असतो. मतदार हा उमेदवारापेक्षा शहाणा असतो, जागृत मतदार हे सर्व काही पाहत असतात हे विरोधकांना कळत नाही याचे दुर्देव आहे. एक माणूस इतरांना एकदाच फसवू शकतो. वैराग भागातील संतनाथ साखर कारखाना कोणी बंद पाडला या सर्व गोष्टी त्यांना माहीत असल्यानेच आपल्याला यापूर्वी मताधिक्य मिळाले आहे. माणूस मेल्यावर कोणतेही धन सोबत नेता येत नाही हे सतत डोळ्यासमोर ठेवून ३० वर्षापेक्षा जास्त काळ काम केले. तालुक्यातील विकासासाठी ६५० कोटी रुपयांची वीजेच्या कामे सुरु झाली. मी जातीवंत वकिल असल्याने आपल्याकडे त्याचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत. भिमा - सीना जोड प्रकल्पासाठी आवाज उठवून विधानसभेत केलेल्या भाषणांचेही पुरावे आहेत. विरोधकाला इंजिनिअर, फडणवीस असे उच्चारदेखिल स्पष्टपणे करता येत नाहीत. उजनीवरुन शेतीसाठी पाणी आणतांना बोगद्याची संकल्पना देखिल आपली होती त्याचे इतिवृत्त आपल्याकडे उपलब्ध आहे.
 
Top