बार्शी - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा बहुतांशी वेळ हा कोणाची तरी वाट बघण्यात जातो, तारुण्य आणि वाट यांचा जवळचा संबंध आहे, स्पर्धेतील काही विद्यार्थ्यांचा वेळ कोणाची तरी वाट लावण्यात जातो, चांगल्या संस्काराची माणसे आपला वेळ वाट दावण्यात घालवतात, विद्यार्थ्यांनी आपला बहुमोल वेळ वाट पाहण्यात घालविण्यापेक्षा स्वत:च्या यशाची वाट शोधण्यात घालविल्यास त्यांचे भवितव्य उज्वल राहील असे प्रतिपादन कुंटी, झारखंड येथील जिल्हाधिकारी, बार्शी तालुक्यातील सुपुत्र रमेश घोलप यांनी व्यक्त केले.
     इंडियन रेड क्रॉस सोसायटी, सौ.प्रभावती सुरेशचंद्र कुंकूलोळ शिशु विकास केंद्र संचलित स्पर्धा परिक्षा ग्रंथालय व अभ्यासिका केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. बबन यादव, आय. पी. एस. अधिकारी संजय खरात, आय. एफ. एस. सचिन भोसले, पोलिस उप अधिक्षक प्रशांत अमृतकर, प्राचार्य शिवपूत्र धुत्तरगाव, रोटरीचे अध्यक्ष गौतम कांकरिया, विक्रीकर अधिकारी सतिश काकडे, डॉ.काका सामनगावकर, उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ व स्पर्धा परिक्षेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.   
    स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांनी नवनवीन ज्ञान आत्मसात करण्यासाठी सतत वाचन केले पाहिजे, त्यासाठी वेळोवेळी अनुभवींकडून सांगीतलेल्या मार्गावर चालण्याची ओढ हवी, तितक्याच तातडीने त्याची अंमलबजावणी करायला हवी. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पेटणं, भेटणं आणि रेटणं या त्रिसूत्रीचा योग्य वेळी वापर करायला पाहिजे. मुंबईतील एसआयएस या संस्थेचे नांव आदरार्थी घेतले जाते त्याच धर्तीवर स्पर्धा परीक्षेतील बार्शीसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय इंडियन रेडक्रॉसच्या वतीने मोफत होत आहे याचा आनंद वाटतो. या ठिकाणी गरजवंत विद्यार्थ्यांना त्यांची बौध्दीक तपासणी करुन सुविधा पोहोचविण्यात येणार आहेत. चांगल्या मार्गदर्शकांमार्फत वेळोवेळी मार्गदर्शन, चांगल्या विद्यार्थ्यांचा समुह करुन स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असलेले वातावरण निर्माण करण्याचा इंडियन रेडक्रॉसचा मानस आहे, त्यामुळे मुंबई-पुणे आदी ठिकाणी शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी बार्शीत राहूनच स्पर्धा परीक्षांची चांगली तयारी करतील. यशदा या नामवंत संस्थेसारखे वातावरण निर्माण होईल अशी आशा वाटते, बार्शीची ओळख ही चांगले अधिकारी घडविणारे व अधिकार्‍यांची बार्शी म्हणून होईल, दृष्टीकोनावरही यश अवलंबून असते. तुमची परिस्थिती, तुमची अडचण यालाच प्रेरणा बनवायला शिका, माझी परिस्थिती हीच माझी प्रेरणा होती त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या आर्थिक परिस्थितीकडे बघून खचू नये. खुटी या नक्षली भागासारख्या ठिकाणी आपण सध्या काम करत असल्याने महाराष्ट्रात आल्यावर कोणी गडचिरोलीची भिती दाखविणार नाही. जी माणसे ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करत असतात, ती सातत्यानं धडपडत असतात, लोकांच्या मते ती धड नसतात कारण ती सतत पडत असतात, पण खर्‍या अर्थानं ती पडत नसतात, कारण पडता पडता ती घडत असतात, त्यामुळ पडत जा घडत जा यशाची प्रत्येक पायरी दिमाखानं चढत जा, येणार्‍या अडचणीतील संकटाला पार करुन पुढं जा, चुका करणे हा मानसाचा गुणधर्म आहे परंतु एका दगडाला दोनदा ठेचकाळणे हा मुर्खपणा ठरेल. चांगले काम करतांना मांजरापेक्षा माणसेच जास्त आडवी जातात, जंगलातील वणवा विझविण्यासाठी चिमणीचा प्रयत्न प्रामाणिकपणाचा असतो त्याप्रमाणे इंडियन रेडक्रॉसचा उपक्रम सुरु असल्याचेही रमेश घोलप यांनी म्हटले. अजित कुंकूलोळ यांनी प्रास्ताविक केले, संजय खरात, सचिन भोसले, प्रशांत अमृतकार, प्राचार्य शिवपूत्र धुत्तरगाव, गौतम कांकरिया, डॉ.बी.वा.यादव, संतोष कौलवार ,कालिदास गाढवे, अनिल खाडे यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्र संचालन विजय दिवानजी व आभार सुभाष जवळेकर यांनी केले.
 
Top