येरमाळा : 'येळकोट घे'च्या गजरात दहिफळ गावचे ग्रामदैवत श्री खंडोबा देवाचा आगाडा बगाडाच्या मंदिरास प्रदक्षिणा पार पाडल्या. श्री खंडोबा देवस्थानच्या चंपाष्टमी यात्रेत हा कार्यक्रम पार पडला.
सकाळपासून श्री खंडोबा देवाचा गजर करत पूजाअर्चा करून बाजरीची भाकर व वांगी भर्ताचा नैवेद्य भाविकांकडून दाखविण्यात आला. लोखंडाच्या लंगाराची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर श्रीकांत धोंगडे व तुकाराम भातलवंडे यानी लंगर तोडला. यावेळी भंडारा खोबर्‍याची उधळण व 'येळकोट-येळकोट घे..'च्या गजराने नगरी दुमदुमली. आगडा बगाडावर मानकरी पुरुषोत्तम जोशी व सुतार कुटुंबाला उभे राहण्याचा मान असतो. यात्रेत राजे ग्रुपच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रा कमिटीचे अध्यक्ष नामदेव कोठावळे, हरिश्‍चंद्र भातलवंडे, सतीश मते, समाधान मते, सरपंच दत्तात्रय बोरके, हणमंत मते यांच्यासह गावकर्‍यांनी व्यवस्थेसाठी पुढाकार घेतला. दरम्यान, खंडोबाच्या या यात्रेनिमित्त २८रोजी कुस्त्यांचा फड भरविण्यात येणार असून यासाठी परजिल्ह्यातील पैलवाणही येणार आहेत.
 
Top