बार्शी :- भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने देशव्यापी एक दिवसाच्या लाक्षणिक संपाचे आयोजन केले होते. बार्शीतील कर्मचार्‍यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला तर अधिकार्‍यांची गैरहजेरी दिसून आली.
    बार्शीतील बीएसएनएल विभागातील अधिकार्‍यांची नेहमीच वाणवा दिसून येते. सरकारचे जावई असल्याच्या थाटात काम करणारे कायम कर्मचारी या ठिकाणी नेहमीच प्रकर्षाणे दिसून येतात. अनेक कर्मचार्‍यांच्या बाबत कधीही वेळेवर कामावर न येता, कामातील टाळाटाळ, आपले काम दुसर्‍यावर ढकलणे, आलेल्या तक्रारदार व ग्राहकांना चुकीचे उत्तर देणे, या प्रकारामुळे शासनाच्या उपक्रमातील सेवेचा ग्राहकांना आर्थिक नुकसान व असमाधानकारक सेवा मिळत असल्याने ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस घटली आहे. या कार्यालयात प्रत्येक ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. याउलट तात्पुरते सेवेत घेतलेल्या कर्मचार्‍यांकडून चांगली सेवा देण्यात येतांनाही त्यांच्या वेतनाचे व सेवेत सामावून घेण्याचे प्रश्‍न मागील कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या कार्यालयात मागील २२ वर्षांपासून तात्पुरत्या सेवेत व सर्व तांत्रीक कामांचा अनुभव असलेल्या कर्मचारी रामलिंग भिमा बसवंत याने आपल्या व्यथा यावेळी बोलून दाखविल्या. त्याच्यासारखे आणखी बरेच कर्मचारी मागील काही वर्षांपासून सेवेत असतांना त्यांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित राहिले आहेत.
    कर्मचार्‍यांच्या मागण्यांमध्ये बोनस, ग्रुप डी (वर्ग ४ कर्मचारी वेतन), अनुकपा कर्मचार्‍यांचे प्रश्‍न, रजेवर बाहेरगावी जाण्याची मागणी, मेडिकल ऍडव्हान्स, इ.मा.व. कर्मचार्‍यांच्या परीक्षेत गुणांची सवलत, तात्पुरत्या स्वरुपातील भरती केलेल्या कर्मचार्‍यांना सेवेत सामावून घेणे, ऑपरेटर, वाहन चालक, लाईनमन, क्लर्क यांच्या वेतनश्रेणीत वाढ करावी. लाईनमन परीक्षा पात्रता अटींची शिथीलता, मूळ वेतनात वाढ व फरक, सर्व कर्मचार्‍यांना रु.२०० चे सीमकार्ड, तात्पुरत्या कर्मचार्‍यांना नियमित कर्मचार्‍यांप्रमाणे वेतन मिळावे, दुरुस्तीसाठी व नवीन कनेक्शनसाठी आवश्यक असलेल्या उपकरणांची व साहित्यांची उपलब्धता करावी, आवश्यकतेनुसार कर्मचार्‍यांची वाढ करावी, आदी मागण्यांसाठी या संपाचे आयोजन करण्यात आले होते.
    यावेळी कर्मचारी संघटनेचे व्ही.एस.पाटील, के.ए.चव्हाण, व्ही.बी.कापुरे, एल.एस.घुगे, ए.सी.मणियार, बाळासाहेब माने, मनोज भोकरे, अशोक बरचे, एच.एस.कोळेकर, यल्लाप्पा कबाडे, एस.जी.शिंदे, इस्माईल शेख, रामलिंग बसवंत, जनक पालके, हनुमंत जाधवर, ए.एन.इंगळे, विकास बगाडे आदी उपस्थित होते.
 
Top