उस्मानाबाद :- आगामी काळात जिल्ह्यात टंचाईसदृश् परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आणि सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात  पाणी टंचाई जाणवू नये, यासाठी टंचाई कृति आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी यासंदर्भात  पाणीटंचाईबाबत अधिका-यांना आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. सध्या टंचाई परिस्थितीत जनतेस पिण्याचे पाणी  व शेतीसाठी पाण्याची टंचाई जाणवणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केल्याचे दिसून येत आहे.
      सध्या ऑक्टोबर 2014 ते डिसेंबर 2014  या कालावधीसाठी 53 सार्वजनिक विहीरीचे अधिग्रहण करुन 39 गावे/ वाडया वस्तीला पाणीपुरवठा करण्यासाठी 32 लाख 70 हजाराची तरतुद करण्यात आली असून  22 गाव, वाडया, वस्तीला टँकर/ बैलगाडीने पाणीपुरवठयासाठी 32 लाख 70 हजाराची तरतुद करण्यात आली आहे. 3 गाव, वाडी व वस्तीला पाणीपुरवठा करता यावी यासाठी  नळयोजनेच्या विशेष दुरुस्तीसाठी 18 लाखाचा, 15 नवीन विंधन विहीर घेणे/ कुपनलिका घेण्यासाठी 7 लाख 50 हजाराचा व 2 तात्पुरत्या पुरक नळ योजना घेण्यासाठी 7 लाखाचा असे एकुण 84 लाख 28 हजार रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
          जिल्हयात 8 नगरपालिका असून त्यापैकी परंडा व कळंब नगरपालिका क्षेत्रात संभाव्य  पिण्याची पाण्याची टंचाई जाणवणार असून  या शहरांना पाणी पुरवठा करण्यासाठी प्रत्येकी 20 टँकरची आवश्यकता भासणार आहे. टँकरने पाणीपुरवठा करता यावा,  यासाठी कळंब तालुक्यातील चोराखळी साठवण तलाव व परंडा तालुक्यातील सिना कोळेगाव प्रकल्पातून टँकरने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
         नागरी व शहरी ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी तलावांच्या पाणी आरक्षणासंदर्भातही निर्णय घेण्यात आला आहे. उस्मानाबाद तालुका व शहर पाणीपुरवठा योजनेसाठी उजणी धरण, तेरणा प्रकल्प, शिंगोली तलाव व शेरकरवाडा , तुळजापूर व नळदुर्ग शहारासाठी  तुळजापूर शहर योजनेसाठी कुरनूर प्रकल्प बोरी तलावाचे आरक्षण करण्यात आले आहे. लोहारा तालुक्यातील 22 खेडी प्रा. पाणीपुरवठा योजनेसाठी माकणी व 3 गावास निम्न तेरणा प्रकल्पातून,  ढोकी व 4 गावे पाणीपुरवठा योजनेसाठी तेरणा मध्यम प्रकल्प, तुळजापूर तालुक्यातील जळकोटसाठी खंडाळा तलाव, तुळजापूर तालुक्यातील अणदूर बोरीसाठी बोरी का. स्व. न. पा. पुरवठा योजना, वाशी तालुक्यासाठी वाशी, पारडी, कन्हेरी, कोळेवाडी या गावासाठी आरसोली मध्यम प्रकल्प, भूम तालुक्यातील हाडोंग्रीसाठी आरसोली मध्यम प्रकल्पातील पाणी  आरक्षण करण्यात येणार आहे.
      उस्मानाबाद जिल्हयात एक  मोठा प्रकल्प असून त्याची  उपयुक्त पाणीसाठा 76.190 द.ल.घ.मी. आहे. 17 मध्यम असून या  प्रकल्पात पाणी साठवण्याची क्षमता 202.86 द.ल.घ.मी. आहे. सध्या या प्रकल्पात 41.45 दलघमी पाणीसाठा आहे, 196 लघु प्रकल्प असून या प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा 355.77  द ल घ मी आहे. सध्‍या या प्रकल्पात 92.02 दलघमी पाणीसाठा आहे. जिल्हयात भविष्यात पाणीटंचाई भासू नये, यासाठी प्रशासनपातळीवर नियोजन करण्यात येत आहे.
 
Top