उस्मानाबाद :- संविधान जागृती अभियानांतर्गत शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांच्यावतीने बुधवार, २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचीत्य साधून सकाळी ८ वाजता जिजाऊ चौक ते तुळजाभवानी क्रीडा संकुलापर्यंत ‘संविधान फ्लॅगमार्च’चे आयोजन करण्यात आले आहे. 
       शहरातील संविधान फाऊंडेशन, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, अंधश्रध्दा निर्मूलन समिती, टायगर सेना, लोकप्रतिष्ठान, मुस्लिम सामाजिक संघटना, रोटरी क्लब, मराठवाडा साहित्य परिषद, उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघ, जिल्हा मराठी पत्रकार संघ, शिवराज्याभिषेक सोहळा समिती, भाई उध्दवराव पाटील क्रीडा मंडळ, शिवशंभु प्रतिष्ठान, कास्ट्राईब कर्मचारी संघटना, बानाई, अंनिस, जमात-ए-इस्लामी हिंद, मुस्लिम विकास परिषद, जिल्हा व्यापारी संघ, मराठवाडा साहित्य संमेलन, सरसभारत वाचक चळवळ, महाराष्ट्र खासगी वाहनचालक संघटना, बहुउद्देशिय महासंघ, बार असोसिएशन, उस्मानाबाद दावा फाऊंडेशन, प्रेरणा सामाजिक व सांस्कृतिक मंडळ, ग्राहक आधार संघटना, एकता युवा मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंच, व्हिजन करिअर अकॅडमी आदी ४० संस्था संघटनांच्या प्रतिनिधींची यावेळी उपस्थिती असणार आहे. 
        या फ्लॅगमार्चला बुधवारी सकाळी ८ वाजता जिजाऊ चौक येथून प्रारंभ होणार आहे. फ्लॅगमार्चमध्ये शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी सहभागी होणार आहेत. नळदुर्ग येथील ‘आपलं घर’ संस्थेेचे कलापथकही असणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे येथील तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलावर आल्यानंतर सकाळी १० वाजता संविधानाच्या प्रास्ताविक वाचनाबरोबर इतर कार्यक्रम होणार आहेत. या उपक्रमात शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संविधान जागृती अभियानच्यावतीने करण्यात आले आहे.
 
Top