उस्मानाबाद -: रोजगार हमी योजनेतील अपूर्ण कामे पूर्ण करण्याला प्राधान्य द्या, मजुरांना त्यांच्या मागणीप्रमाणे कामे उपलब्ध करुन द्या, अशी सूचना राज्याच्या पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकसचिव डॉ. महेश पाठक यांनी जिल्हा प्रशासनाला केली. त्याचबरोबर त्यांनी उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी आणि कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथे भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली.
         येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकसचिव डॉ. पाठक यांनी मंगळवारी आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, अपर जिल्हाधिकारी जे.टी.पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांच्यासह विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
         यावेळी सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा सादर केला. तसेच, टंचाई निवारणासाठी प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
         यावेळी डॉ. पाठक म्हणाले की,  रोजगार हमी योजनेची कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्या. शेल्फवरील कामे असली तरी मजुरांची मागणी आली की कामे सुरु करा. विशेषता जलसंधारण आणि पायाभूत कामांना प्राधान्य देण्याची सूचना त्यांनी केली.
        मराठवाड्यासह राज्याच्या काही भागात भागात टंचाईची परिस्थिती आहे. गारपीट, अपुरा पाऊस यामुळे विविध भागातील पीकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधीत जिल्ह्यात जाऊन तेथील पालक सचिव आढावा घेत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याचा आढावा डॉ. पाठक यांनी घेतला.
        जिल्ह्याने केलेला टंचाई कृती आराखडा, त्याअनुषंगाने करण्यात येणारी कामे यांची माहिती घेतली. तात्पुरत्या पूरक नळ पाणीपुरवठा योजना, विहिर-विंधन विहीरींची विशेष दुरुस्ती,  नियमित दुरुस्ती,  पाणीपातळी खोल असलेल्या ठिकाणी प्राधान्याने जलसंधारणाची कामे हाती घेण्याची सूचनाही त्यांनी केली. जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून अखेर पर्यंतचा संभाव्य टंचाई आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
         जिल्ह्यातील पशुधन, त्यासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता याची माहितीही त्यांनी घेतली.  राज्य व जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग आणि कृषी विभाग यांनी समन्वयाने काम केल्यास  टंचाई परिस्थितीवर मात करता येऊ शकते असे त्यांनी सांगितले. किसान कॉल सेंटरच्या मोफत दूरध्वनी सेवेवरुन शेतकऱ्यांना अधिकाधिक मार्गदर्शन आणि प्रबोधन करण्याची सूचना त्यांनी केली. 
          मागील वर्षी टंचाई अंतर्गत अधीग्रहण व विविध कामांसाठीचा राज्य स्तरावर प्रलंबित असणारा निधी जिल्ह्याला मिळण्यासाठी पाठपुरावा करु, असे त्यांनी सांगितले.
            बैठकीनंतर  पालकसचिव डॉ. पाठक यांनी ढोकी आणि गोविंदपूर या गावांना भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. त्याठिकाणी त्यांनी संबंधित स्थानिक शतकऱ्यांशी संवाद साधून पीक परिस्थिती, पाण्याची उपलब्धता आदींची माहिती घेतली. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्यासह उपविभागीय अधिकारी अभिमन्यू बोधवड (उस्मानाबाद) आणि सचिन बारवकर (कळंब), तहसीलदार सुभाष काकडे (उस्मानाबाद) आणि वैशाली पाटील (कळंब) या पाहणीवेळी त्यांच्यासमवेत होते.
        टंचाई आढावा बैठकीला सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कृषी, पशुसंवर्धन, जलसंधारण, पाटबंधारे, जिल्हा परिषद यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
Top