बार्शी (मल्लिकार्जुन धारुरकर)  पूर्वीची शेती श्रेष्ठ, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी ही म्हण मधल्या काळात खोटी ठरली. त्याची जागा श्रेष्ठ नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेतीमध्ये झाला. काळानुसार पूर्वीची म्हण खरी होत असल्याचे चित्र निर्माण होत असून शेतीला पुन्हा चांगले दिवस येत आहेत. सद्यस्थितीत शेतीमधील प्रगत तंत्रज्ञान, शेतकर्‍यांच्या शेतीविषयक ज्ञानातील भर, नवनवीन प्रयोगातून जास्त
उत्पादने देणार्‍या जातींची निर्मिती यातून अनेक शेतकरी करोडोंच्या संपत्तीचे मालक झाले आहेत. अनेक उच्चपदस्थ अधिकारी स्वत:ची नोकरी सोडून स्वत:ची शेती विकसीत करतांना दिसून येत आहेत व त्यांच्या यशोगाथांची दखल घेऊन प्रसिध्दीमाध्यमे इतर शेतकर्‍यांना दिशा देण्याचे काम करीत आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून सुरु केलेल्या शेळीपालनातून वर्षाला ५ लाखांचे उत्पादन घेऊन भातंबरे ता.बार्शी येथील तुळशीदास खुने या शेतकर्‍यास अतिरिक्त फायदा झाल्याचे त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे सांगीतले आहे. बंदिस्त शेळीपालन न करता दिवसभर माळरानावर भटकंती करुन झाडपाल्यावर शेळीच्या गुजरानीबरोबरच त्यांच्यासठी उभारलेल्या शेडमध्ये परत आल्यावर मका आदी खाद्य त्यांना देण्यात येते. त्यांच्यापासून दररोज उत्सर्जीत होणार्‍या मल मुत्रांची साठवण करुन त्याचा वापर त्यांनी आपल्या शेतीमध्ये खत व औषधांसाठी केला आहे.
 शेतकर्‍यांनी आपल्या शेतीव्यवसायाबरोबरच शेळीपालन केल्यास त्यांना चांगले उत्पादन मिळू शकते, त्याची काळजी व निगा राखण्यासाठी मोफत मार्गदर्शन करु असे सांगत शेळीला सर्दी, ताप, संडास आदी रोगांतून मृत्यू होऊ शकतो त्यासाठी विविध औषधे व लस उपलब्ध आहेत. निष्काळजीपणामुळे होणार्‍या रोगाने शेळीच्या मृत्यूची भिती वगळता इतर कोणताही धोका नसल्याचे खुने यांनी सांगीतले. खुने यांनी सुरुवातीस बँकेचे कर्ज घेऊन उस्मानाबादी जातीच्या ७५ शेळ्या विकत आणल्या. त्यांच्या पालनपोषणास दिवसभरासाठी दोन व्यक्ती तर इतर वेळी दोन जण लक्ष देतात. शेळीपालनासाठी त्यांनी सुमारे पाऊन एकर क्षेत्राचा परिसर वापरला आहे. यासाठी सुमारे साडेतीन लाख रुपयांचे शेड उभारण्यात आले आहे. पाण्यासाठी त्यांनी कुपनलीका (बोअर) घेतली असून पिण्याच्या पाण्यासाठी दररोज २०० लिटर तर स्वच्छतेसाठी १ हजार लिटर पाणी लागते. खाद्यासाठी सुमारे ३०० रुपये खर्च येतो. त्यांनी घेतलेल्या ५ लाख कर्जाला साधारण १ लाखापर्यंत व्याज असे एकूण सहा लाखापर्यंत खर्चासाठी सव्वालाख रुपये तर वर्षाकाठी साधारणत: ५ लाखांचे उत्पादन होते. शेळीच्या वेळोवेळी तपासणीसाठी पशूवैद्यकिय अधिकारी येऊन उपचार करतात. एका शेळीच्यापोटी सहा महिन्यातून दोन पिले तर वर्षाकाठी ४ पिले जन्माला येतात. ६ महिन्याची पिले ५ हजारापर्यंत तर १ वर्षांची ८ हजारापर्यंत विकली जातात. १५ किलोपर्यंत वजन भरणार्‍या बोकडाची ६ हजारापर्यंत किंमत येते. पहिल्यांदाच गाभण होणार्‍या शेळीची ४ हजारापर्यंत विक्री होते. त्यांनी सुरुवातीला घेतलेल्या ७६ शेळ्यांच्या उत्पादनातून दिड वर्षांत ३ लाख रुपयांची विक्री करुन आज ७६ च्या १५० शेळ्या म्हणजे ३ लाखांच्या गुंतवणूकीची आजची ६ लाखांची शेळी शिल्लक राहिली आहे. त्यांनी शेळीच्या मूत्राची साठवणूक करण्यासाठी पाईपलाईनद्वारे मोठ्या टाकीपर्यंत नेले असून दोन महिन्याला साधारणत: १ हजार लिटर साठवले जाते. त्याचा वापर त्यांच्या लिंबोनीच्या बागेसाठी औषधे म्हणून व काही विक्रीसाठी केला. साधारणत: १ हजार लिटरचे शेळीचे मूत्र ५ हजारांना विकले जाते. सर्व शेळ्यांसाठी वर्षाला साधारणत: १ हजार रुपयांचा लसीकरणाचा खर्च तसेच पोत सुधारण्यासाठी थोडाफार खर्च येतो. अधिक माहितीसाठी तुळशीदास खुने ८६००७२४७७९ यांचेशी संपर्क साधावा.

 
Top