उस्मानाबाद -  महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथोत्सव उपक्रमास गेल्या तीन वर्षापासून संपूर्ण राज्यात चांगला प्रतिसाद लाभत आहे. वाचन चळवळ वाढविण्यासाठी आणि वाचकांना त्यांच्या आवडीची पुस्तके एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावीत, यासाठी राज्य शासनाने हा उफक्रम सुरु केला. या उपक्रमाने अल्पावधीत चांगले रुप घेतल्याचे चित्र दिसत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात प्रकाशकांनी नोंदविलेला सहभाग, जिल्ह्यातील रसिक वाचकांनी त्यास भरभरुन दिलेला प्रतिसाद आणि प्रसारमाध्यमांनी त्याची घेतलेली दखल यामुळे हा उपक्रम अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचला.  या उपक्रमाचे हे चौथे वर्ष असून  दि. 2 ते 4 मार्च, 2015 या कालावधीत सांस्कृतिक सभागृह, आनंदनगर, उस्मानाबाद येथे या ग्रंथप्रदर्शन व विक्री उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने या तीन दिवसीय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यांत विविध साहित्यिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. त्याचबरोबर नामवंत प्रकाशकांची पुस्तके एकाच ठिकाणी मिळणार आहेत. सध्या परीक्षांचा हंगाम असला तरी दहावी व बारावीचे विद्यार्थी वगळता इतर विद्यार्थ्यांनी हे ग्रंथप्रदर्शन पाहावे तसेच जिल्ह्यातील महाविद्यालयांनाही त्यांच्या विद्यार्थ्यांना या ग्रंथप्रदर्शनास आवर्जून भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विविध महाविद्यालयांच्या साहित्य मंडळाचे प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनीही तीन दिवसांत त्यांच्या सोईप्रमाणे या ग्रंथप्रदर्शनास आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालये-ग्रंथालये यांच्याशीही संपर्क साधून अधिकाधिक मोठ्या प्रमाणात येथील ग्रंथप्रदर्शनाचा त्यांनी लाभ घ्यावा आणि त्यांचा सहभाग नोंदवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. 
जिल्ह्यातील विविध संस्था-संघटना, सार्वजनिक मंडळे यांचे पदाधिकारी, सदस्य यांनीही या उपक्रमास आवर्जून भेट द्यावी आणि पुस्तक खरेदीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आहे आहे. 
या उपक्रमास मराठवाडा साहित्य परिषदेची उस्मानाबाद शाखा, नगरवाचनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, आकाशवाणी आणि जिल्हयातील सर्व प्रसारमाध्यम प्रतिनिधींचे सहकार्य लाभले आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन, पोलीस प्रशासन, शहर वाहतूक शाखा, नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागही या उपक्रमाच्या आयोजनात सहकार्य करीत आहे. 
दि. 2 मार्चपासून सुरु होणाऱ्या या ग्रंथोत्सवात लोकसाहित्य प्रकाशन, राजहंस प्रकाशन (पूजा ग्रंथ वितरण), प्रतिभास प्रकाशन, इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट, पृथ्वीराज प्रकाशन, सुविद्या प्रकाशन, विचारसेतू पुस्तकालय, साईशयाम पुस्तकालय, विकास बुक सेलर्स, सविता प्रकाशन, विजय प्रकाशन, ज्ञानदाता साहित्य सेवा, मायबोली इंटरप्रायजेस, विश्वरुपी पुस्तकालय, ग्रंथाली प्रकाशन, साकेत प्रकाशन, अलवी बुक सेंटर, शिवशंभू युवा प्रकाशन, श्रीनाथ बुक मार्केटींग, ज्ञानसागर प्रकाशन, संदर्भ प्रकाशन, संस्कार प्रकाशन, शब्द प्रकाशनआणि अक्षर प्रकाशन हे खासगी प्रकाशक- विक्रेते  सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर शासकीय ग्रंथागार औरंगाबाद आणि बालभारती पुणे यांचेही स्टॉल्स याठिकाणी राहणार आहेत. 
ग्रंथोत्सवात तीनही दिवस सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत ग्रंथप्रदर्शन रसिक वाचकांसाठी खुले राहणार असून जिल्ह्यातील रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबादच्या वतीने करण्यात आले आहे.   

 
Top