उस्मानाबाद -  जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने येथील दी उस्मानाबाद क्लब येथे सुरु असणाऱ्या आद्या महोत्सवास उस्मानाबादकर नागरिकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. विशेषत: महिला वर्गाने खरेदीसाठी केलेली गर्दी, खाद्य पदार्थांच्या स्टॉल्सवर आबालवृद्धांची उडालेली झुंबड यामुळे आद्या महोत्सवात सहभागी झालेल्या बचत गटांच्या प्रतिनिधींच्या चेहऱ्यावरही समाधान झळकत आहे. 
राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने हे स्वयंसहायता समुह-बचत गट निर्मित वस्तूंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री महोत्सव आयोजित केला आहे. दि. 26 फेब्रुवारी रोजी या महोत्सवास प्रारंभ झाला. दि. 26 व 27 या दोन दिवसांत 34 बचत गटांनी तब्बल 1 लाख 19 हजार रुपयांची विक्री केली. या प्रदर्शनात विविध बचत गटांनी खाद्य पदार्थ, लेदर वर्कसचे चप्पल व बूट, सफेद मुसळी, आयुर्वेदीक पावडर, घोंगडी, आवळा कॅन्डी,  चटणी, ज्वेलरी, लसूण पापड, महिलांचे सौंदर्य प्रसाधने आदी विक्रीसाठी उपलब्ध करुन दिली आहेत. 
या महोत्सवाला भेट देणारेही आवर्जून येथील वस्तूंची खरेदी करुन एक प्रकारे बचत गट चळवळीला बळ देण्याचे काम करीत आहेत. या महोत्सवात जिल्ह्याबाहेरीलही 9 बचत गटांनी सहभाग नोंदविला आहे. हा महोत्सव दि. 2 मार्चपर्यंत सुरु राहणार असून अधिकाधिक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते यांनी केले आहे.         

 
Top