उस्‍मानाबाद -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याची निवडणुक भाजपा प्रणित बळीराजा विकास पॅनल पुर्ण गांर्भियाने लढवित असून यशस्वी साखर कारखानदारीतला मोठा अनुभव आमच्याही पाठींशी आहे. सभासद शेतकर्‍यांनी निश्‍चित होऊन भाजपा प्रणित पॅनलला भरघोस मतांनी विजयी करावे व कारखान्यातील आतापर्यंतची  एकाधिकारशाही मोडुन काढावी, असे आवाहन भाजपाचे युवक नेते तथा लोकमंगलचे कार्याध्यक्ष रोहन देशमुख यांनी केले.
     डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याच्या निवडणुकीची पुर्व तयारी बैठक उस्‍मानाबादच्‍या प्रमोद महाजन सभागृहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड.मिलिंद पाटील हे उपस्थित होते. यावेळी पॅनल प्रमुख तथा भाजपा नेते संजय निंबाळकर, संजय पाटील-दुधगावकर,भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, रामभाऊ पडवळ यांची उपस्थिती होती. 
यावेळी बोलताना रोहन देशमुख म्हणाले की, डॉ. आंबेडकर साखर कारखान्याचे चेअरमन अरविंद गोरे हे इतर कारखान्यात झालेल्या गैर कारभाराचा दाखला देत स्वतःचा प्रचार करीत आहेत. व इतर पॅनलच्या उमेदवारांना कारखानदारीतला अनुभव नाही, असे सांगुन सभासदांची दिशाभूल करीत आहेत. परंतू आम्ही साखर कारखानदारीमध्ये यशस्वी काम करून दाखवले आहे. या अनुभवाच्या जोरावर आम्ही निवडणुक रिंगणात उतरलो आहोत व या कारखान्याचा कारभारही संपुर्ण पारदर्शक व सभासदांना विश्‍वासात घेऊन अत्यंत सचोटीने करून दाखवू. ऊस गाळपासाठी सभासदांची चेअरमन अरविंद गोरे यांनी चालविलेली थट्टा सभासद विसरणार नाहीत. वास्तविक कारखान्याच्या गाळपासाठी सभासदांच्या ऊसाला प्राधान्य देणे गरजेचे असताना बिगर सभासदांचा व कार्यक्षेत्राबाहेरील ऊसाचा वापर सध्या करीत आहेत.त्यामुळे सभासदांनी खंबीरपणे भाजपा प्रणित बळीराजा विकास पॅनलच्या पाठीशी उभे रहण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले . तत्पुर्वी अॅड. मिलिंद पाटील यांनी उपस्थित सभासद शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना चेअरमन अरविंद गोरे यांच्या एकाधिकारशाहीचे वाभाडे काढले. अरविंद गोरे यांच्याकडून सभासद शेतकर्‍यांना अपमानास्पंद वागणुक मिळत असून या निवडणुकीत सभासद शेतकरी अरविंद गोरे यांना त्‍यांची जागा दाखवून देतील अशा शब्दात टिका केली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील-दुधगावकर यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण माने तर आभार धनंजय शिंगाडे यांनी मानले. या कार्यक्रमास भिमराव साळुके, मोहन खापरे, नवनाथ क्षिरसागर, जीवन देशमुख, सतिश देशमुख,शहराध्यक्ष भिमा अण्णा जाधव आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. 

 
Top