उस्मानाबाद - शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष भाई शिवाजीराव साळुंखे यांचे शनिवारी वार्धक्याने निधन झाले.
शिवाजीराव साळुंखे १९८१ पासून नगरवाचनालयाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तसेच राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळ संचलित छत्रपती शिवाजी हायस्कूलचे अध्यक्ष, औरंगाबाद कृषी विभागाचे सहसंचालक या पदावरून ते सेवानिवृत्त झाले. शेकापच्या शेतकरी सभेचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी सक्रीय काम पाहिले आहे. अमरावती आणि हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतले. उर्दू भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. काही दिवसांपूर्वी उपचारासाठी सोलापूर येथील रूग्णालयात दाखल केले होते. दोन दिवसांपासून शहरातील साई हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सुरज साळुंके यांचे ते अजोबा होत. त्यांच्या पश्चात तीन मुली, जावई, दोन नातवंडे, असा परिवार आहे. त्यांच्या रविवारी सकाळी ८ वाजता पार्थिवावर वैराग रोड येथील पांढरी स्मशानभूमीजवळील शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.